छोट्या शहरांमध्ये वैद्यकीय परिषदा होणे गरजेचे – डाॅ.प्रल्हाद प्रभुदेसाई

सिंधुरेस्पिकाॅन वैद्यकीय परिषद कुडाळ येथे संपन्न

परिषदेत ५०० डाॅक्टरांचा सहभाग

प्रतिनिधी । कुडाळ : डाॅक्टरांचे वैद्यकीय ज्ञान अद्ययावत होण्यासाठी, अशा परिषदा कुडाळसारख्या छोट्या शहरांमध्ये होणे गरजेचे आहे ,जेणेकरून ग्रामीण भागातील डाॅक्टरना त्याचा फायदा होईल असे मत मुंबई येथील लीलावती रुग्णालयाचे डाॅ.प्रल्हाद प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. कुडाळ तालुक्यात झाराप येथे रविवारी झालेल्या सिंधुरेस्पिकाॅन या श्वसनविकारावरील वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग, वर्किंग कमिटी कुडाळच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंधुरेस्पिकाॅन ‘ ह्या वैद्यकीय परिषदेला जिल्ह्यातील डाॅक्टरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.यावेळी व्यासपीठावर डाॅ.राजेंद्र,पाताडे.संजीव आकेरकर, डाॅ.जयेंद परूळेकर, डाॅ.प्रशांत कोलते,डाॅ. जी.टी .राणे ,डाॅ.संतोष जाधव, डाॅ.गौरी परुळेकर, डाॅ.गिरीश बोर्डवेकर, डाॅ.मिलिंद बोर्डवेकर व डाॅ.वैभव आईर उपस्थित होते.
रविवारी झालेल्या या परिषदेला पाचशेहून अधिक डाॅक्टर्स उपस्थित होते. या परिषदेमध्ये विविध श्वसनविकारांवर व्याख्याने व कार्यशाळा झाल्या. मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली,गोवा व सिंधुदुर्ग येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नामवंत फुफ्फुसविकार तज्ज्ञांनी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यामध्ये डाॅ.प्रल्हाद प्रभुदेसाई (मुंबई), डाॅ.संदीप साळवी(पुणे), डाॅ.नितिन अभ्यंकर (पुणे), डाॅ.जगदिश ढेकणे ( पुणे), डाॅ.अनिल मडके (सांगली), डाॅ.अजित कुलकर्णी( कोल्हापूर ), डाॅ. हिमांशू पोफळे( पुणे), डाॅ.मोहन पोतदार( कोल्हापूर), डाॅ.प्रविण भट ( गोवा), डाॅ.स्नेहल गोवेकर ( सिंधुदुर्ग), डाॅ.निलेश कोरडे (गोवा) यांनी व्याख्याने सादर केली.
करोना नंतर आज श्वसन विकारात वाढ झाली आहे, श्वसनासंदर्भात नवीन समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे हे आजार गांभीर्याने पाहण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आज त्यावर नवनवीन तंत्रज्ञान, उपचार पद्धती विकसित झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील डॉक्टरांना याचे अद्यावत ज्ञान मिळावे आणि त्याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णांना मिळावा, या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांशी आपल्या जिल्ह्यातील डॉक्टरांचा संवाद व्हावा यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या आदल्या दिवशी जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांशी जिल्हाबाहेरुन आलेल्या या तज्ञ डॉक्टरांनी संवाद साधला. त्यामध्ये अनेक तातडीच्या सेवा, अतीगंभिर रुग्णांवर तत्काळ उपचार पद्धती याबद्दलच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन केले..
डाॅक्टरांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीबद्दल व एकंदर परिषदेचे उत्तम आयोजन, वेळेचे काटेकोर नियोजन, सिंधुदुर्गवासियांचे प्रेमळ आदरातिथ्य या सर्वांबाबत अतिथी वक्त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या वैद्यकीय परिषदांची गरज महानगरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये अधिक आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.परिषद यशस्वी होण्यासाठी कुडाळ मेडिकल असोसिएशन च्या सर्व डॉक्टर्स नी मेहनत घेतली. संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन डाॅ.गौरी परुळेकर, डाॅ.दर्शना कोलते,डाॅ.सई राणे व डाॅ.प्रशांत मडव यांनी केले.
या परिषदेमुळे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या विविध पॅथीच्या डॉक्टरांना याचा फायदा होईल आणि ग्रामीण रुग्णांना याचा उपयोग होईल असा विश्वास डॉ विवेक रेडकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!