कणकवली शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का!
युवासेना सरचिटणीस गौरव हर्णे भाजपमध्ये
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून विरोधकांना धक्का
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची लोकसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचाराचा वारू मतदारसंघात जोरदार दौडत आहे. अशात आता कणकवली शहरातील उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. कणकवली शहरातील युवा सेना तालुका सरचिटणीस असलेल्या गौरव हर्णे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश केल्याने कणकवली शहरात ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गौरव हर्णे यांनी यापूर्वी नगरपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याशी जोरदार लढत दिली होती. अवघ्या दोन मतांनी त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात झालेला हा प्रवेश म्हणजे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची नेते मंडळी शहरातील असताना देखील ठाकरे गटांना धक्का देत आमदार नितेश राणे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या राजकीय खेळीत झालेला हा प्रवेश हा येत्या काळात लोकसभे मध्ये शहरात भाजपच्या मतांमध्ये भर घालणारा ठरणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी सभापती दिलीप तळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली