भाजप-शिंदे गटाचे अखेर ‘तुझ्या गळा माझ्या गळा !’

कुडाळ येथील बैठकीत गैरसमज दूर
एकदिलाने नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार
निलेश जोशी । कुडाळ : शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात आता सारे काही आलबेल आहे, कोणतेही गैरसमज नाहीत, असे शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ प्रमुख बबन शिंदे आणि मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी स्पष्ट केले आहे. . शिवसेना शिंदे गट कुडाळ मालवण तालुका आणि भाजप पदाधिकारी यांची समन्वय बैठक आज कुडाळ मध्ये झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघासाठी महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून पाच दिवस उलटले तरी शिवसेना व भाजप यांच्यात अद्याप समन्वय साधलेला पाहायला मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील महालक्ष्मी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत तसेच स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावस्कर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर या उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या बैठकीपासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते. समन्वय बैठक बंद दाराआड संपन्न झाली.
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी तक्रारींचा पाढाच वाचला. महायुती मध्ये आम्हाला सावत्र भावाची नाही तर सख्या भावाची वागणूक अपेक्षित आहे असा सूर शिवसेना पदाधिकऱ्यातून उमटला. या बैठकीला भाजपच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसंच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने किरण उर्फ भैय्या सामंत जिल्हाप्रमुख संजय आंग्रे जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर, मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर उपस्थित होते. बैठकीनंतर शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये समन्वय झाल्याचे सांगण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बहुमताने निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचा आपकी बार चारसो पारचा नारा यशस्वी करून त्यांना पंतप्रधान करू, असा विश्वास यावेळी बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आमच्यातले जे काही गैरसमज होते ते आता दूर झाले आहेत. आता आम्ही पूर्ण ताकदीनिशी महायुती धर्माचे पालन करून नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहणार असे यावेळी या दोघांनी सांगितले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.