मालवणी वातावरणात संपन्न झाला रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड शो

ज्येष्ठ रंगकर्मी चंदू शिरसाट यांना कला सन्मान पुरस्कार प्रदान
मालवणच्या हापूस गॅंगने जिंकली मालवणी रिल्स स्पर्धा
निलेश जोशी । कुडाळ : आम्ही मालवण्यानी आमच्यातील खेकडा वृत्ती सोडूया आणि मालवणी माणसाला नेहमी प्रोत्साहन देऊया, असा संदेश देत रिल्स मालवणी आयोजित मालवणी अवॉर्ड सोहळा मोठ्या थाटात आणि मालवणी वातावरणात गुरुवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात संपन्न झाला. ४ एप्रिल हा मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाचे औचित्य साधून रिल्स मालवणी या ग्रुपच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी या मालवणी अवॉर्ड शोचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी कुडाळचे चंदूकाका शिरसाट यांना पहिला कला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच विविध १६ विभागातील विजेत्याना मालवणी अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात संपन्न झालेल्या या मालवणी अवॉर्ड शोची सुरुवात मालवणी भाषेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या एका डॉक्युमेंट्रीने झाली. निलेश जोशी यांनी या डॉक्युमेंटरीचे लेखन केले होते तर रिल्स मालवणीचे हर्षवर्धन जोशी यांनी हि डॉक्युमेंटरी तयार केली होती. . त्यांनतर या मालवणी अवॉर्ड शोचे उदघाटन युवा उद्योजक अनंतराज पाटकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आणि ज्येष्ठ रंगकर्मी नंदू पाटील यांच्याहस्ते मच्छिन्द्र कांबळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ वाढवून झाला. यावेळी व्यासपीठावर प्रभाकर सावंत, प्रदीप माने, राजन नाईक, डॉ. नंदिनी देशमुख, निलेश उर्फ बंड्या जोशी, रिल्स मालवाणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर, क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रभाकर सावंत यांनी रिल्स मालवणच्या या उपक्रमाचे कौतुक करत आपली ‘प्रकल्पग्रस्त’ हि एक मालवणी कविता देखील सादर केली. ज्येष्ठ रंगकर्मी नंदू पाटील यांनी कला सन्मान पुरस्कार विजेते रंगकर्मी चंदू शिरसाट यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिल्या. त्याच बरोबर वर्षा वैद्य आणि अभय खाद्पकर यांच्या सोबत आपण मालवणी कविता सादर करताना रसिकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा हे सांगितले आणि कवी प्रमोद जोशी यांची एक मालवणी कविता देखील सादर केली. कीर्ती कॉलेजच्या माजी प्राचार्य डॉक्टर नंदिनी देशमुख यांनी देखील मालवणी अवॉर्ड शोसाठी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. नेरूर येथे मालवणी स्पिकिंग कोर्स आणि दशावताराचा सर्टिफिकेट कोर्स सुरु करणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी यावेळी जाहीर केले. निलेश उर्फ बंड्या जोशी यांनी देखील रिल्स मालवणीच्या सर्व कार्यकर्त्यांचे ‘कलेसाठी धडपडणारी मुले’ अशा शब्दात कौतुक केले आणि मालवणी अवॉर्ड शोसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांनतर विश्वजित पालव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घातलेल्या दणदणीत मालवणी गाऱ्हाण्याने आणि गणेश वंदना नृत्याने अवॉर्ड शोला सुरुवात झाली. मालवणी रिल्सच्या वतीने दिला जाणारा पहिला कला सन्मान पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंदूकाका शिरसाट यांना रंगकर्मी नंदू पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मानपत्राचे वाचन तेजस मस्के यांनी केले. या मानपत्राचे लेखन प्रसिद्ध दिग्दर्शक केदार देसाई यांनी केले होते. यावेळी चंदू शिरसाट यांच्या पत्नी रुपाली शिरसाट यांनी चंदू काकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
एकूण १५ कॅटेगेरीमध्ये विविध मालवणी अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दशावतारातील मालवणी व्यक्तिरेखेसाठी कृष्णा घाटकर याना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मालवणी प्रभावक (इन्फ्लुएन्सर) स्त्री हा पुरस्कार मयेकरीण म्हणजेच अर्चना परब यांना, मालवणी अभिनेता पुरस्कार अभय खडपकर याना जाहीर झाला होता,तो पुरस्कार यांच्यावतीने त्यांच्या बहिणीने स्वीकारला. मालवणी निवेदक पुरस्कार राजा सामंत, मालवणी नाटक पुरस्कार ‘करून गेलो गाव’, मालवणी पत्रकार म्हणून विजय पालकर, मालवणी अभिनेत्री निर्मला टिकम, मालवणी मालिका श्री क्षेत्रपाल वेतोबा, मालवणी बालकलाकार आरव आईर, मालवणी चित्रपट ‘भेरा’, मालवणी दिग्दर्शक राजू सावंत, मालवणी वेब सिरीज ‘देवाक काळजी’, मालवणी गीत रोहन नाथगोसावी, मालवणी प्रभावक (इन्फ्लुएन्सर) पुरुष अनिकेत रासम, मालवणी कुटुंब गणेश कुंभार आणि कुटुंब या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक युट्युबर्स आवर्जून उपस्थित होते. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हापूस गँगच्या वतीने मालवणी रिल्सचा देखील हापूस आंब्याची पेटी देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर बाव गावची कन्या कॅप्टन दीपाली विजय गावकर आणि छोट्या बायोची मोठी स्वप्न मालिकेतील छोटी बयो ऋचा नेरुरकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध चित्रकार भूषण मेस्त्री यांनी रेखाटलेले मच्छिन्द्रनाथ कांबळी यांचे चित्र त्यांनी रिल्स मालवणी ग्रुपला भेट दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिल्स मालावणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर यांनी केले तर या संपूर्ण सोहळयाचे आपल्या खुमासदार शैलीत निवेदन केले ते निलेश गुरव आणि रुचिता शिर्के यांनी. आभार विठ्ठल तळवलकर यांनी मानले. यावेळी रिल्स मालवणीचे निलेश गुरव, रुचिता शिर्के, हर्षवर्धन जोशी, रोहन नेरुरकर, चांदणी कांबळी, राम आईर, किरण मेस्त्री, किशोर नाईक. सचिन कोंडस्कर, ओंकार मसके. तुषार देवळी, भावेश तळवलकर, कैलास पालव, मनिष पाटकर, गौरव पाटकर, साईराज नाईक, विवेक पालकर, पुजा सावंत, शरावती शेट्टी, आषिश करंगुटकर, शिल्पा राणे, राम राणे, विश्वजीत पालव उपस्थित होते.
मालवणची हापूस गॅंग ठरली मालवणी रिल्स स्पर्धेची विजेती
मालवणी भाषा दिनाच्या निमित्ताने मालवणी रिल्सतर्फे मालवणी भाषा या विषयावर रिल्सची स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. त्या स्पर्धेला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खूप चांगला प्रतिसाद मिळला. एकूण ७४ रिल्स या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यातून मालवणच्या हापूस गँगच्या रीलला विजेतेपदाचा मान मिळाला. रिल्स मालवणीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
अवॉर्ड शो वर मालवणी वातावरणाचा प्रभाव
यावेळी नेरुरचे रोम्बाट, फुगड्या अशा मालवणी लोककला देखील सादर करण्यात आल्या. सोहळ्याच्या प्रवेशद्वारावर मोठा खेकडा उभारण्यात आला होता. पण त्या खेकड्याचे डेंगे तोडून ठेवले होते. त्याच्या पोटातून प्रवेश करता येत होता. त्यामागची संकल्पना .अशी कि मालवणी माणसाने आपली खेकडा वृत्ती सोडून एकमेकाला मदत करत प्रोत्साहन द्यावे. विठ्ठल तळवलकर यांची हि संकल्पना होती. त्याच बरोबर रंगमंच सुद्धा एखाया टिपिकल मालवणी घराची पडवी (वळय) जशी असते तसा सजवण्यात आला होता. पुरस्कार विजेत्यांना दिले जाणारे शाल, श्रीफळ दगडी सन्मान चिन्ह या गोष्टी सुद्धा शेणाने सारवलेल्या आणि अक्षता असलेल्या सुपातून रंगमंचावर आणल्या जात होत्या.आलेल्या सर्वांचे मालवणी खाजा आणि कोकम सरबत देऊन स्वागत करण्यात आले. असे एकंदरीत कल्पक मालवणी वातावरण या संपूर्ण सोहळ्यात पाहायला मिळाले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.