‘जिव्हाळा’ चे काम समाजासाठी प्रेरणादायी – ऍड. अनिल बर्वे

दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दहा जणांना जिव्हाळा पुरस्कार प्रदान
वृद्धांची परमेश्वरीरूपी सेवा करण्याचे जिव्हाळ्याचे कामे समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कणकवली येथील जेष्ठ वकील ऍड. अनिल बर्वे यांनी जिव्हाळा सेवाश्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त केले. यानिमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दहा जणांना जिव्हाळा गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक आरोग्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा शनिवारी (ता14) जिव्हाळा सेवाश्रम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, तेंडोली जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, माड्याचीवाडी उपसरपंच अस्मिता गावडे, संतोष शेटगावकर, रामकृष्ण सामंत, उपाध्यक्ष राजू बिर्जे, खजिनदार साक्षी बिर्जे, सुंदर मेस्त्री, अरुण परब, दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर, संजय बिर्जे, संदीप बिर्जे, शोभा बिर्जे, गीतांजली बिर्जे, आर्या बिर्जे, श्रेया बिर्जे, प्रशांत केरवडेकर, बाबा गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऍड. बर्वे म्हणाले, जीवनाच्या प्रवाहात वाटचाल करताना सामाजिक बांधिलकी फार महत्त्वाची आहे. जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे, त्यांचे कुटुंबीय आणि विश्वस्त हे गेली दहा वर्षे सामाजिक बांधिलकी ठेवून वृद्धांची मनोभावे सेवा करीत आहेत. मानवसेवेचा अखंड झरा वाहणारे काम जिव्हाळा सेवाश्रमातून होत आहे, हे निश्चितच समाजासाठी प्रेरणा देणारे आहे. संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे यांनी समाजात वावरत असताना आपण समाजाचे देणे लागतो, या उदात्त भावनेने एक सामाजिक बांधिलकीतून वृद्धांची सेवा करणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो. गेली दहा वर्षे ही मनोभावे सेवा सुरू असून भविष्यातही अनेक उपक्रम हाती घेतले जातील. दहा वर्षापूर्वी राज्यात फिरताना अनेक ठिकाणी वृद्धांना सोडून जाणारी त्यांची मुलं नजरेत आली. अशा वृद्धांना आधार मिळावा या उद्देशानेच वृद्धाश्रम सुरू केला आहे असे सांगितले.
उपस्थित सर्व गौरव मूर्तीने यावेळी मनोगत व्यक्त करताना हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणा देणारा पुरस्कार आहे. जिव्हाळ्याचे दहा वर्षाचे कार्य पाहता एक परमेश्वरी सेवा या ठिकाणी करण्याचे काम सुरेश बिर्जे त्यांचे कुटुंबीय आणि विश्वस्त करत आहेत हे निश्चितच अभिमानास्पद आहे.
जिव्हाळा सेवाश्रमच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा जिव्हाळा गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये भेरा चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा खानोलकर, पत्रकार अजय सावंत, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवणचे मुख्याध्यापक माणिक पवार, ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळीचे संचालक प्रसाद परब, नाग्या म्हादू संस्था अध्यक्ष उदय आईर, नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर, माड्याचीवाडी तलाठी वैशाली देसाई, ग्रामसेवक नितेश तांबे, नाट्यलेखक-दिग्दर्शक केदार देसाई तसेच आशासेविका साक्षी शेलटे या दहा जणांचा समावेश होता. यावेळी नवनियुक्त तेंडोली जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील व पाट पंचायत समिती सदस्या प्राची जळवी यांचा जिव्हाळा सेवाश्रमातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर जिव्हाळा सेवाश्रम संगीत विद्यालयाचे शिक्षक योगेश प्रभू व आनंद मोर्ये तसेच त्यांच्या शिष्या ऐश्वर्या चव्हाण व जुही राऊळ यांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक जयप्रकाश प्रभू यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष सांगळे यांनी केले. आभार साक्षी बिर्जे यांनी मानले.
पुरस्कार वितरणानंतर आनंद मोर्ये व योगेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली जिव्हाळा सेवाश्रम संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायन-वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
याच कार्यक्रमात चि. अन्वेश बिर्जे याचा वाढदिवसही आनंदात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात बॅरिस्टर नाथ पै महाविद्यालयाशी संलग्न विद्यार्थी व प्राध्यापिका श्रीमती ओटवणेकर यांच्या उपस्थितीत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरानंतर लाभार्थ्यांना फळवाटप करण्यात आले व दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन झाले.





