भरधाव ट्रकचा पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर आणखी एक प्रताप
ट्रक अपघातग्रस्त, चालक आणि क्लिनर मद्यधुंद अवस्थेत
पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका, स्थानिक नागरिकांचा आरोप
कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर काल रात्री ९ च्या सुमारास भरधाव चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून अपघात झाल्याची घटना घडली. यामुळे पिंगुळी आणि नेरूर या गावात जवळपास ३ तास वीज गायब झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर गणेशघाट नजिक कर्नाटक पासिंग असलेला चिरे वाहतूक करणारा हा ट्रक भरधाव वेगात असताना पलटी झाला. यामुळे या मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात चिरे पडले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रकचे चालक आणि क्लिनर हे दारूच्या नशेत होते. अतिशय भरधाव वेगात असलेला हा ट्रक अपघातग्रस्त झाला त्यावेळी सुदैवाने या मार्गावर वाहतूक नव्हती. ट्रक अपघातग्रस्त होताच चालक आणि क्लिनर हे पळून जाण्याच्या तयारीत होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी त्यांना ताब्यात घेवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या
अपघातस्थळी शेखर गावडे, प्रसाद गावडे, दीपक गावडे, जित मार्गी, बाबल गावडे, जगन्नाथ गावडे, मिलिंद धोंड, अभिषेक गावडे, गणेश गावडे, राजन पुरलकर, दाजी महाजन, रवि गावडे यांच्यासह २०० ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या चिरे किंवा वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचे प्रमाण वाढले असून यामुळे काही दिवसांपूर्वी काळसे येथे अपघातात महिलेला जीव गमवावा लागला होता. तर पिंगुळी वडगणेश मंदिर येथे सुसाट डंपरने दुचाकीचे नुकसान केले होते. या भरधाव ट्रक किंवा डंपरवर कारवाई प्रशासनाकडून कडक कारवाई का होत नाही ? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थानी उपस्थित केला आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीस कायमचे अपंगत्व आले होते. पण मागील काही महिन्यांमध्ये बाहेरील राज्यातील पासींग असणाऱ्या भरधाव ट्रकच्या सिंधुदुर्गात सुळसुळाट सुरू आहे. यावर पोलिस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ