जादूटोणा विरोधी कायदा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करूया – नितीन वाळके
मालवण – महाराष्ट्र शासनाने 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा संमत केला . हा कायदा जनतेला समजणे आवश्यक आहे . त्यासाठी मालवण मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी कार्यशाळा आयोजित करून तो कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला तरच श्रद्धेच्या नावाखाली होणारी सर्वसामान्य जनतेची फसवणूक थांबेल . यासाठी हा कायदा आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचले याचे प्रथम नियोजन करूया असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा . नितीन वाळके यांनी सांगितले .
मालवणमध्ये नुकतीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग व जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सुजाण नागरिकांसाठी जादूटोणा विरोधी कायदा समजून देण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सभा आयोजित केली होती . या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते .
यावेळी त्यांच्या समवेत विचारमंचावर संभाजी कोरे , संजय जाधव , रमेश जाधव , विपीन ठाकूर , विलास वळंजू आदी शिक्षक उपस्थित होते . विजय चौकेकर यांनी सर्वांना शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याचे पत्रके वाटप केली . हा कायदा देव आणि धर्म या विरोधी नसल्याचे सांगितले . तसेच कायद्याच्या बारा कलमांची सविस्तर माहिती दिली . या कायद्यामध्ये कोठेही देव , धर्म , धार्मिकता , उपासना , परंपरा हे शब्द नसून कोणत्याही धर्मातील भक्तीला, उपासणेला , प्रार्थनेला , पूजेला,अथवा विधीला या कायद्याने अटकाव नाही व कोणालाही यासाठी दक्षता अधिकारी अटक करू शकत नाहीत. एवढेच नव्हे तर मंदिर, दर्गे ,चर्च अथवा घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी भूत उतरविण्यासाठी कोणी मंत्र म्हणत असेल, प्रार्थना करीत असेल, भजन करीत असेल, अथवा पूजा, उपासना इत्यादी विधी करीत असेल तरीही कायद्याने गुन्हा होत नाही. त्यामुळे हा कायदा सर्वांनी समजून घ्यावा व लोकांनी श्रद्धेच्या नावाखाली जादूटोणा करणारे भोंदू लोकांपासून सावध व्हावे, यासाठी हा कायदा शाळा, कॉलेज, गावामध्ये व्याख्यानाच्या आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पोहोचवूया असे श्री विजय चौकेकर यांनी सांगितले . यासभेचे सूत्रसंचालन श्री संभाजी कोरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय जाधव सरांनी केले . यावेळी मारुती सोनवडेकर , दिलीप देवगडकर अशोक चावरे सर , प्रविण साबळे सर आदी उपस्थित होते .