एसआरएम कॉलेज कुडाळ मध्ये ३ फेब्रुवारी रोजी ब्रावोलिया २०२४ चे आयोजन

१५ महाविद्यालयातील ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग

बुद्धिमत्तेला वाव देणारा उपक्रम

ऍड. संदेश तायशेटे यांच्या हस्ते होणार उदघाटन

निलेश जोशी । कुडाळ : विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी केलेले संशोधन मांडता यावे यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे ब्रावोलिया – २०२४ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी बी.एम.एस. आणि बी.ए.एफ. तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. . सिंधुदुर्गसह रत्नागिरी, गोवा व बेळगाव येथील १४ महाविद्यालयातून ४७० विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.
दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये ब्रावोलिया २०२४ चे उदघाटन व्हीक्टर डान्टस कॉलेज,कुडाळचे माजी प्राचार्य ऍड. संदेश कृष्णा तायशेटे यांच्या हस्ते व सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
वर्षातून एकदा या उपक्रमाचे आयोजन विभागातर्फे करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता प्रचंड असते पण नेमके काय करायचे याची दिशा मिळत नाही तर या उपक्रमाच्या माध्यमातून विविध कल्पना मांडल्या जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. यामध्ये क्युझेरिया, ऍड मॅड शो, अपना सपना मनी मनी, ट्रेजर हंट, बेस्ट पर्सोना आणि बी. जी. एम. आय. अशा एकूण सहा उपक्रमांचा समावेश आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना विभागातर्फे पारितोषक देऊन गौरवण्यात येईल. विद्यार्थी केंद्रित उपक्रम असून विद्यार्थीच त्याचे आयोजन करतात. तन्मय नातु, ओंकार नाईक, पूर्वा चव्हाण हे विद्यार्थी या कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी आठ समित्या करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी केले आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!