अखेर कणकवलीतील उड्डाणपुलाला भालचंद्र महाराजांचे नाव
कणकवली शहराच्या इतिहासात अजून एक पहाट ठरली ऐतिहासिक
गेली अनेक वर्ष या उड्डाणपुलाला नाव देण्याची होत होती मागणी
भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असतानाच उड्डाणपुलाचे नामकरण
महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या कणकवली उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असताना कणकवलीतील भालचंद्र महाराजांचे भक्त व कणकवलीकर यांच्याकडून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास हे नामकरण करण्यात आले. कणकवली पटवर्धन चौकामध्ये बाजारपेठ कडे येणाऱ्या रस्त्याच्या दिशेने हा नामकरण फलक लावण्यात आला असून या फलकावर भालचंद्र महाराज यांच्यासह आप्पासाहेब पटवर्धन यांचा फोटो व स्वयंभु रवळनाथ या ग्रामदेवतेचे नाव देखील लावले आहे. कणकवली शहरातील उड्डाण पुलाला भालचंद्र महाराज यांच्या सोबतच आप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्याची ही मागणी काही वर्ष सुरू होती. अद्याप पर्यंत या उड्डाणपुलाला नाव देण्या बाबत केवळ चर्चा झालेल्या असताना प्रशासकीय पातळीवरून याबाबत कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. दरम्यान आज कणकवली शहरात पहाटे घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. काल रात्रीपासूनच याबाबतची कुजबूज कणकवली शहरात चालू होती. व त्यानंतर आज सकाळी भालचंद्र महाराज यांच्या नावाने उड्डाणपूलाचे नामकरण केले. त्यामुळे कणकवली शहरातील उड्डाणपूल आता यापुढे भालचंद्र महाराज उड्डाणपूल या नावाने ओळखले जाणार आहे. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यापूर्वी अनेकदा स्थलांतरित करण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. हा पुतळा देखील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्थलांतरित करण्यात आला होता. व गेली अनेक वर्ष सुरू असलेला हा प्रलंबित प्रश्न महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर चुटकीसरशी सुटला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कणकवली शहरात पहाटेच्या प्रहरी ही एक महत्त्वपूर्ण घटना घडल्याने कणकवलीच्या इतिहासात या पहाटेची पुन्हा एकदा नोंद होणार आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली