कळसुली मार्गावरील खडी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

सरपंच सचिन पारधीये यांच्यासह अनेक ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

अन्यथा पुन्हा रास्ता रोको करणार

तालुक्‍यातील कळसुली आणि शिवडाव मधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज कळसुली मार्गावर डंपरच्या माध्यमातून होणारी खडी वाहतूक रोखली. प्रशासनाने बेकायदा सुरू असलेले काळ्या दगडांचे उत्खनन थांबवावे. विनापरवाना डंपर वाहतुकीवर कारवाई करावी आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्‍या. याबाबतचे निवेदनही कणकवली प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यात बेकायदा दगड उत्खनन आणि वाहतूक न थांबल्‍यास पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला.
तालुक्‍यातील कळसुली आणि शिवडाव गावात ११ क्रशर आहेत. या क्रशरवरून डंपरच्या माध्यमातून खडी वाहतूक होते. हे डंपर भरधाव वेगाने हाकले जात असल्‍याने वारंवार अपघात होत आहेत. तसेच काळ्या दगडासाठी डोंगरामध्ये सुरूंग स्‍फोट केले जात आहेत. त्‍यामुळे कळसुली आणि शिवडाव गावातील अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. क्रशरमधून येणाऱ्या धुळीमुळे शेती बागायती धोक्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे संतप्त झालेल्‍या कळसुली आणि शिवडाव ग्रामस्थांनी आज कळसुली मार्गावर एकत्र येऊन डंपर वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात कळसुली सरपंच सचिन पारधिये यांच्यासह जयवंत घाडीगावकर, अच्युत घाडीगावकर, दगडू गावकर, निलेश गावकर, परेश घाडीगावकर, परेश गावकर,जयवंत घाडीगावकर, तुकाराम घाडीगावकर, किशोर घाडीगावकर, महेंद्र घाडीगावकर, महेंद्र घाडीगावकर, सुभाष घाडीगावकर, रमेश मेस्त्री, बळीराम पेंडूरकर, स्वप्नील नेरकर, घाकु घाडीगावकर, संजय नेरकर आदींसह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
ग्रामस्थांनी रास्ता रोको करून डंपर वाहतूक रोखल्‍यानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर कळसुली आणि शिवडाव ग्रामस्थांच्यावतीने कणकवली प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये कळसुली गावामध्ये काळ्या दगडाच्या क्‍वारी कायमस्वरूपी बंद करण्याबाबत ठराव करण्यात आला. तरीही अपर जिल्‍हाधिकारी शंकर बर्गे यांनी नाईक स्टोन इंडस्ट्रीजच्या वैभव नाईक यांना स्टोन क्रशर आणि काळ्या दगडांच्या क्‍वारींना परवानगी कशी दिली याची विचारणा करण्यात आली आहे. तसेच क्‍वारी तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. याखेरीज आज कणकवली कळसुली मार्गावर खडी वाहून नेणारे दोन डंपर आढळून आले. या डंपरचे पासिंग झालेले नाही. डंपर चालकांकडे वाहन परवाना नाही. डंपरवर ताडपत्री नाही, त्‍यामुळे या दोन्ही डंपरवार कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याखेरीज दगड उत्खनन करण्यासाठी हळवल येथील मनोज गंगाधर राणे यांच्या घरांमध्ये स्‍फोटके ठेवण्यात आली आहेत. ही इमारत पूर्णत: अनधिकृत आहे. येथे ठेवण्यात आलेल्‍या स्फोटकांमुळे नागरी भागाला धोका निर्माण झाला आहे. त्‍यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्‍यास पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!