नांदरुख – मालवण गिरोबाचा जत्रोत्सव बुधवारी

नयनरम्य शोभिवंत फटाक्यांच्या आतेषबाजीसाठी सुप्रसिद्ध

कणकवली :- – नांदरुख -मालवणसह देवबाग, तारकर्ली, वायरी, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवण आदी १० गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या जागृत ग्रामदेवता श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि. २९ नोव्हेंबरला होत आहे. रात्रो पालखीच्या आगमन समयी सनईच्या सुरावर ढोल ताश्याच्या गजरात होणार्या नयनरम्य शोभिवंत फटाक्यांच्या आतेषबाजीसाठी हा जत्रोत्सव राज्यात विशेष सुप्रसिद्ध आहे.

(या नांदरुखचे मानकरी, कणकवलीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.)

छ. शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ल्याची उभारणी करताना कामगारांच्या सोयीसाठी गिरोबा देवस्थान नजिकच बाजारपेठ उभारली होती. सिंधुदूर्ग किल्ला उभारणीच्या वेळी नांदरुख गावातून छत्रपती घोड्यावरून जा- ये करीत‌ असत. एवढे ऐतिहासिक महत्त्व या गावाचे आहे.

जत्रोत्सवाच्या दिनी रात्री पलिकडील वाडीतील मांडावरुन सनई ढोल ताशांच्या गजरात पालखीचे गिरोबा मंदिराकडे आगमन होते. मंदिरानजिक पालखीचे आगमन होताच किमान अर्धा तास नयनरम्य शोभिवंत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ही आतषबाजी मालवण शहरानजिकच्या कुंभारमाठ आदी उंच भागातूनही दृष्टीस पडते.

पालखीचे आगमन मंदिरात झाल्यावर जत्रोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होतो. स्थानिक आणि माहेरवाशिणी यांच्या ओटी भरण्यास सुरुवात होते. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा होते. त्यावेळी पुन्हा फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली जाते. रात्री १२ वाजल्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे पौराणिक नाटक होते. पहाटे दहिहंडी फोडून जत्रोत्सवाची सांगता होते.

या जत्रोत्सवाला मालवणसह मुळ नांदरुख गावच्या वाड्या असलेल्या आणि अलिकडे स्वतंत्र ग्रामपंचायती झालेल्या ९ गावांतील भाविक अलोट गर्दी करतात.

error: Content is protected !!