प्रतिबंधित पान मसाला विक्री प्रकरणी कणकवली दोन व्यवसायिकांवर कारवाई
कणकवलीत गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ
अन्न व औषध प्रशासनाने भर चौकात कारवाई केल्याने अनेकांना धसका
अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी सकाळी 11 ते 11.30 वा. च्या सुमारास कणकवली बाजारपेठेतील दोन पानशॉपवर छापा टाकून 44 हजार 593 रु. प्रतिबंधित पानमसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखू जप्त केला. या प्रकरणी दोन पानशॉप मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने प्रतिबंधित पानमसाला विकणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
पहिली कारवाई आप्पासाहेब पटवर्धन चौकातील कोरगावकर पानशॉपवर करण्यात आली. या पानशॉपचे मालक तुषार मंगेश कोरगावकर (28, रा. आशिये) याच्याकडून 14 हजार 661 रु.चा नजर, दुबई, विमल हा प्रतिबंधित पानमसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला. तर दुसरी कारवाई कणकवली बाजारपेठेतील स्वामीदत्त पानशॉपवर करण्यात आली. या शॉपचे मालक विजय दिगंबर कोरगावकर (48, रा. विद्यानगर कणकवली) यांच्याकडून 29 हजार 932 रु. चा आरएमडी, नजर, विमल, दुबई, राजनिवास हा प्रतिबंधित पानमसाला आणि व्हीवन सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही संशयितांवर लोकसेवकाच्या आदेशाचा भंग, प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा तसेच शरीराला घातक पदार्थांची विक्री करणे या कलमानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर उपस्थित होते.
कणकवली/ प्रतिनिधी