अखेर कणकवलीत मटक्यावर कारवाई झाली, पण “त्या” मेसेजची मोठी चर्चा!
एकावर गुन्हा दाखल, 3 हजार 500 रुपये जप्त
कणकवली पोलिसांची कारवाई
कणकवली शहरात मोठ्या प्रमाणावर मटका सुरू असताना या अनधिकृत मटक्यावर कारवाई कधी होणार? याबाबत काही दिवसांपूर्वीच प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज कणकवली पोलिसांकडून कणकवली शहरातील एका मटका व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली. मात्र इतर मोठ्या मटका व्यवसायिकांना काही दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचा “मेसेज” दिला गेल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आजच्या कारवाईपेक्षा “त्या” मेसेजची कणकवली मध्ये मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान आज कणकवली शहरातील बस स्थानका नजीक पत्र्याच्या स्टॉलच्या आडोशाला थांबून दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारे कागदावर आकडेमोड करून कल्याण मटक्याच्या चिठ्ठ्या देत असताना आढळून आल्याने कणकवली तालुक्यातील नागवे येथील गजानन विष्णू पाताडे (39 नागवे पाताडेवाडी) याच्यावर महाराष्ट्र जुगार ऍक्ट कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कल्याण मटका आपण स्वतः चालवत असल्याचे त्याने कबूल केल्याचे पोलीस फिर्यादीत म्हटले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक पावती पुस्तक, 3 हजार 500 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश म्हेत्रे यांनी फिर्यादी दिली आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, मनोज गुरव, महिला पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी केली.
दिगंबर वालावलकर /कणकवली