अन्यथा पिंगुळीत ”काळसे” घटनेची पुनरावृत्ती टळली !

पोलीस प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका !, भरधाव डंपरवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर नजिकच्या बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या दुचाकीला डंपरची जोरदार धडक बसली. यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. तर तेथे उभ्या असलेल्या एका युवकाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर डंपर त्याच वेगात दुभाजाकावरून दुस-या लेनवर गेला. या घटनेपूर्वी ५ मिनिटे अगोदर तेथील बसस्टॉपवरील प्रवाशी एसटी बसने कुडाळच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा तेथे काळसेच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असती. मात्र, भरधाव डंपरवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
काल सकाळी पावणे अकराच्या सुमारास पिंगुळी वडगणेश मंदिरजवळील बसस्टाॅपवर डंपरचा दुसरा अपघात झाला. गोवा येथून मालवणच्या दिशेने वाळू भरण्यासाठी भरधाव वेगाने हा डंपर जात होता. मात्र, तेथे आल्यावर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि महामार्गालगत उभ्या असलेल्या दुचाकीला फरफटक नेत बसस्टाॅपवर उभ्या असलेल्या एका युवकाला धडक दिली. तेथे महामार्गालगत दुचाकी उभी करून दुचाकीस्वार मंदीरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. तर त्या दुचाकीपासून काही अंतरावर एक युवक बसच्या प्रतिक्षेत उभा होता. त्याचवेळी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या डंपरने त्या दुचाकीला जोरात धडक देऊन दुचाकी १५ ते २० फूट अंतरापर्यंत फरफटत नेली. याचदरम्यान बसस्टाॅपवर उभ्या असलेल्या त्या युवकाला धडक बसून त्याला गंभीर दुखापत झाली. त्याने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने बचावला. त्यानंतर त्याच वेगात डंपर दुभाजाकावरून विरूध्द लेनवर काही अंतर जाऊन कुडाळच्या दिशेने उभा राहिला. या ठिकाणच्या बसस्टाॅपवर दररोज प्रवाशी उभे असतात. काल सुद्धा तेथे मुले आणि प्रवाशी उभे होते. मात्र, ही घटना घडण्यापूर्वीच पाच मिनिटे अगोदर आलेल्या एसटी बसने मुले व प्रवाशी कुडाळच्या दिशेने रवाना झाले. तसेच दुचाकीस्वारही मंदिरात गेला होता. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा काळसेच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असती अशी भीती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व्यक्त केली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!