गावाच्या विकासाचे 15 वा वित्त आयोग हे महत्त्वाचे माध्यम

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे प्रतिपादन
कणकवली पं.स आयोजित सरपंच, ग्रामसेवक प्रशिक्षण शिबीर
15 वा वित्त आयोग अंतर्गत प्रशिक्षण शिबीरातून ग्रामविकासाच्या संकल्पनांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य शासनाकडून थेट निधी मिळण्याचा 15 वा वित्त आयोग हा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच या योजनेला गावाच्या विकासाचे महत्त्त्वाचे माध्यम समजले जाते. या योजनेतून प्राप्त होणार्या निधीमधून आपल्या गावाचा आदर्शवत व शास्वत विकास करण्याचे काम केले पाहिजे असे आवाहन कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत कणकवली पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामविस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, अधिक्षक अनिल चव्हाण, पक्ष अधिकारी मनिषा देसाई, चंद्रहास परब, प्रशिक्षक पंढरी माणगांवकर, रितू पांचाळ आदी उपस्थित होते.
अरुण चव्हाण म्हणाले, 15 वा वित्त आयोग मधील 2020-21 वर्षातील 30 ते 35 टक्के व 2021-22 वर्षातील 20 ते 25 टक्के निधी खर्च झाला आहे. निधी खर्च होण्यामध्ये असणार्या तांत्रिक अडचणी जवळपास मार्गी लागल्या असून 80 टक्के अंदाजपत्रके पूर्ण झाली आहेत. या 2 वर्षासाठीचा निधी खात्यामध्ये जमा असून ग्रा.पं. कडून सातत्याने त्यावर अमंलबजावणी करणे आवश्यक आहे. पुढील वर्षाचा आराखडा करताना तो कॉपी पेस्ट न करता आपल्या गावाचा स्वतंत्र असा शाश्वत विकासासाठीचा आराखडा तयार करावा असे आवाहन अरुण चव्हाण यांनी केले. दिवसभरात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, ग्रामविस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, यशदाचे प्रतिनिधी पंढरी माणगांवकर, रितू पांचाळ यांनी शाश्वत विकासातील गरीब मुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभुत सुविधायुक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, महिलास्नेही गाव यांसह ग्रामविकासातील विविध संकल्पनांवर मार्गदर्शन केले
कणकवली प्रतिनिधी




