सुनेचा छळ करत अघोरी कृत्य केल्याप्रकरणी माजी खासदार विनायक राऊतांवर गुन्हा दाखल

गितेश राऊत यांच्यासह एकूण 7 जणांवर जादूटोणा, नरबळी प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा
गिरीजा गीतेश राऊत यांच्या तक्रारीमुळे मोठी खळबळ
सुनेचा छळ करत तिच्यावर अघोरी कृत्य केल्याप्रकरणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार विनायक राऊत त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जादूटोणा अधिनियम, नरबळी व इतर अघोरी कृत्य प्रतिबंध अधिनियम, व भारतीय न्याय संहिता कलमानुसार ठाणे कपूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनायक राऊत यांची सून गिरीजा गितेश राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आजपर्यंत माझे पती गितेश राऊत ह्यांनी लग्न जुळवताना त्यांचा वाकोला येथे बंगला असल्याची खोटी माहिती देऊन लग्न जुळवण्यासाठी त्यांच्या रुनवाल सिंफनी, मुंबई येथील फ्लॅटमध्ये बैठक घेऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत महाराष्ट्र, ऊटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, नॉर्वे, दुबई, केनिया, थायलंड, ई. या देशांत फिरायला गेलो. यावेळी त्यांना काही खाजगी बाबतीमध्ये विचारणा केल्यास मला सातत्याने शिवीगाळ करून मारहाण केली. या उलट माझ्यावर बाहेरची बाधा झाली असे कारण पुढे करून माझे सासरे, विनायक राऊत, यांच्या सांगण्यावरून चुलत सासरे, आबा रा. भांडुप, मुंबई, फिरोज बाबा कोलगाव, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग, काझी बाबा करूड घाट, ता. राजापूर, जि. रत्नागिरी हरीशचंद्र घाडी नानेली गाव ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांनी माझेवर वेगवेगळ्या प्रकारची अघोरी कृत्य केले. माझे पती, गितेश राऊत, हे शारीरिक संबंध करण्यास असक्षम असल्याचे सासरे विनायक राऊत, सासू शामल राऊत यांना माहीत असून ही त्यांनी गितेशचे माझ्या सोबत लग्न लावून दिले. तसेच सासू शामल राऊत हिने मला घरातील जेवण, देवपूजा व ईतर बाबींवर मानसिक त्रास देऊन, मासिक पाळीपुढे करण्यासाठी सातत्याने गोळ्या घेण्यासाठी भाग पाडून माझी तब्बेत बिघडवण्यास कारणीभूत झाली. तसेच वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करत असताना ते ईलाज नाकारून मला “होम इन्सेमिनेशन” हा पर्याय करण्यावर दबाव टाकून मला खूप त्रास दिला आहे. असा हा सर्व प्रकारे माझा शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळकरून, माझे आर्थिक खच्चीकरण करून आणि माझ्यावर अनेक अघोरी ईलाज करून माझा अमानुष छळ केला आहे. त्यामुळे गितेश राऊत, सासू व सासरे शामल राऊत व विनायक राऊत, तसेच लग्न जुळवणारे गितेश राऊत ह्याची सख्खी आत्ते बहीण सुरेखा राजेश सरफरे आणि तिचे पती राजेश सरफरे, आबा राउत रा.भांडुप, मुंबई, फिरोज बाबा कोलगाव, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग, काझी बाबा करूड घाट, ता. राजापूर, जि. रत्नागिरी हरीशचंद्र घाडी नानेली गाव ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांच्या विरुद्ध तक्रार करत आहे. तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.






