समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांमध्ये भूमीगत विद्युत वाहिन्या

सिंधुदुर्ग साठी ९९५ कोटी निधी मंजूर

मालवण, देवगड, वेंगुर्ले, कुडाळ चा समावेश

कणकवली : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंतच्या सर्व वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत. त्‍यासाठी केंद्राने २९५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. पुढील पंधरा दिवसांत ठेकेदार निश्‍चित होऊन प्रत्‍यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. वीज वाहिन्या भूमिगत झाल्‍यानंतर वादळ सदृश्य परिस्थितीत किनारपट्टीवरील गावे अंधारात जाण्याचा धोका कमी होणार आहे.
तौक्‍ते वादळाचा मोठा फटका किनारपट्टीला बसला. यात महावितरणचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. किनारपट्टी लगतची गावे अनेक दिवस अंधारात राहिली. याचा पर्यटन व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला. तौक्‍ते वादळाच्या घटनेनंतर केंद्राने सिंधुदुर्ग किनारपट्टीचे सर्वेक्षण केले होते. त्‍यानंतर आता किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंतच्या सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोका शमन प्रकल्प’ अंतर्गत मंजुरी दिली आहे. यात देवगड तालुक्‍यातील २०१, मालवण तालुक्‍यातील २५१ आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील २२६ किलोमीटरच्या वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत. यात ११ केव्ही आणि ३३ केव्हीच्या वीज वाहिन्यांचा समावेश असल्‍याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
तौक्‍ते वादळानंतर महावितरणतर्फे भूमिगत वीज वाहिन्यांबाबत सर्व्हे केला होता. यात देवगड तालुक्‍यातील २०१ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्यांसाठी २८० कोटी, मालवण तालुक्‍यातील २५१ किलोमीटरच्या वीज वाहिन्यांसाठी २३१ कोटी आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील २२६ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्यांसाठी १६७ कोटींची मागणी केली होती. यात केंद्राने देवगडसाठी ५१ कोटी, मालवणसाठी ६४ कोटी आणि वेंगुर्ले तालुक्‍यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्‍या २९५ कोटी रूपयांच्या भूमिगत वीज वाहिन्या कामांसाठी डिसेंबर २०२२ मध्ये निविदा मागविण्यात आल्‍या. जानेवारी २०२३ मध्ये या कामासाठी ठेकेदार निश्‍चित केला आहे. त्‍यामुळे किनारपट्टीवरील वीज वाहिन्या भूमिगत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात सध्या मालवण शहर हद्दीतील मेढा ते राजकोट या भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याची कार्यवाही पूर्ण झाली होती. त्यानंतर आता वर्षभरात जिल्ह्यातील देवगड ते वेंगुर्ले पर्यंतच्या सर्व किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत. त्‍यामुळे वादळी वारे तसेच वीज वाहिन्यांवर माडाच्या फांद्या कोसळून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबणार आहेत.
किनारपट्टी भागात बहुतांश वीज वाहिन्या ह्या माडांच्या खालून गेल्‍या आहेत. त्‍यामुळे विद्युत खांबावरील वीज वाहिन्यांचे जाळे हे नेहमीच धोकादायक ठरत आले आहे. हा धोका कमी करण्यासाठी केंद्राने २००७ मध्ये आयपीडीएस योजनेतून मालवण, वेंगुर्ले या शहरांसह कणकवली आणि सावंतवाडी या नगरपालिका क्षेत्रासाठी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी होणारी रस्ता खुदाई आणि रस्त्यांची दुरूस्ती यासाठी प्रतिमिटर ९०० ते १५०० रूपयापर्यंतचा दर नगरपालिका, नगरपंचायती यांनी निश्‍चित केला होता. हा खर्च केंद्राच्या आयपीडीएस योजनेत बसत नव्हता. त्‍यामुळे चार शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांची कामे रखडली होती. मात्र, आता केंद्राने पुन्हा किनारपट्टी भागातील दोन किलोमीटर पर्यंतच्या अंतरातील वीज वाहिन्यांसाठी निधी मंजूर केला आहे.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!