सिलेंडर 200 रुपये स्वस्तचा आनंद की घरगुती सिलेंडरवरच्या रद्द सबसिडीचे दुःख ?

गृहिणींना पडला आहे प्रश्न

मनसे माजी तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांची टीका

महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना सरकारचे “अच्छे दिन” न परवडणारे !

ऐन सणासुदीच्या काळात डाळींचे भाव कडाडल्याने जनता हवालदिल

प्रतिनिधी । कुडाळ : केंद्र सरकारने २९ ऑगस्ट २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपये स्वस्त केल्याचे चित्र भासवून सरकार कसे गोरगरिबांसाठी कल्याणकारी निर्णय घेत आहे याचा सत्ताधारी भाजपाकडून उदो उदो चालू आहे. मात्र याच वेळी अत्युच्च शिखरावर पोहचलेली महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे याचं श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पुढं का येत नाहीत असा सवाल मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे. सर्वसामान्य घरातील महिलांना सिलेंडर 200 स्वस्त झाल्याच्या आनंदापेक्षा त्यावर मिळणारी सबसिडी रक्कम केंद्र सरकारने फेब्रुवारी 2020 पासून बंद केल्याचे दुःख अधिक आहे अशी बोचरी टीका करत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला आहे.
एकीकडे सिलेंडर स्वस्त झाल्याच्या बातम्या येतात तर दुसरीकडे ऐन सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढतात. तूरडाळ दोन महिन्यांत 100 ते 110 रुपयांवरुन चक्क 160 ते 170 रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळ 57 ते 58 रुपयांवरुन 70 रुपये प्रति किलोवर गेली आहे. उडीद डाळ 90 रुपयांवरून 110 रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूर डाळीतही किलोमागे दहा-बारा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मूग डाळ 80 ते 85 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेली आहे.याचबरोबर वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे जनता मेटाकुटीस आली असून त्याचं श्रेय सत्ताधारी कधी घेणार आहेत? सर्व सामान्य जनतेसाहित कष्टकरी शेतकऱ्यांना व कामगार वर्गाला हे “अच्छे दिन” परवडणारे नसून पूर्वीचे “बुरे दिन” परत द्या अशीच जनतेची माफक भावना असल्याचा टोला गावडेंनी प्रसिद्धीपत्रकातुन सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!