किती बळी घेतल्यावर शासनाला जाग येणार ?

समाजसेवक महानंद चव्हाण यांचा खडा सवाल !
कणकवली/मयुर ठाकूर.
३१ ऑगस्टला एक हृदयद्रावक घटना घडली .एका क्षणात एका गरीब कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले .
जनतेच्या हितासाठी,शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाने या जिल्ह्यात मोठी व लहान अशी धरणे , पाझर तलाव बांधली . जन सामान्यांना दिलासा मिळाला . त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे फोंडा कुर्ली येथील देवधर धरण
या धरणाची निर्मिती झाल्यापासून आज मितीस कित्येक गोर – गरीबांचे बळी या धरणांने घेतले. कारण धरण झाले पण त्यानंतरच्या पायाभूत सुविधा आज पर्यंत जेवढ्या व्हायला हव्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत .
संबंधीत विभागाने कालव्याच्या रूपाने पाणी पुरवठा सुरु केला पण हे मोठ मोठे कालवे सुमारे दहा पंधरा फुट खोल असून त्यांना आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन नाही . ज्या वाडीवस्ती जवळून हे कालवे वाहतात त्यांना बंदिस्तपणा नाही. कित्येक शेतकऱ्यांची जनावरे पडून यात मृत झाली पण नुकसान भरपाई नाहीच .
कालच्या घटनेत माझा समाज बांधव रमेश शिरवलकर रा . फोंडा – साईनगर यांचा एकुलता एक मुलगा कु. उदय वय वर्षे १६ ,हा मुलगा फोंडा हायस्कूल येथे इयता दहावीत शिकत होता.
घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे,
त्याचे घर म्हणजे एक छोटी पत्र्याची कुटी आहे.
रमेश शिरवलकर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा कसाबसा गाडा चालवितात . त्यात थोडी मदत म्हणून दुभत्या दोन म्हैशी आहेत.
उदय आणि त्याची आठ वर्षाची लहान बहीण अशी ही दोन भावंडे शाळेतून आल्यावर गुरांना चारण्यासाठी नेत असत . रोजच्या प्रमाणे कालही त्यांनी गुरे चारण्यासाठी नेली व उदय कालव्याच्या कठड्यावर बसला आणि तोल जाऊन खोल चिखलमय कालव्यात पडला. चिंखल असल्यामुळे व रुतल्यामुळे त्याला बाहेर येणे शक्य झाले नाही. आणि त्यातच त्याचा अंत झाला.
घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक व हानिकारक आहे . मी माझ्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतो. समाजाच्या माझ्याकडे आशायुक्त अपेक्षा आहेत.
मी स्थानिक आमदार ,लोक प्रतिनिधी यांना नम्रविनंती करतो की , आपण या घटनेची शहानिशा करावी . आणि शिरवलकर कुटुंबाला मदतीचा हात दयावा . आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधीत प्रकल्प प्राधिकरणाला जाग आणावी .