ठरवून दिलेल्या जागे व्यतिरिक्त भाजी, फळ,फुले, दुकाने थाटल्यास व वाहने पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई!

कणकवली नगरपंचायत च्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षकांच्या सूचना
फ्लाय ओव्हर ब्रिज खालील अतिक्रमणे दोन दिवसात हटवणार
कणकवली शहरात स्टेट बँकेसमोरील उड्डाणपुलाखालील जागेत दुचाकी पाकिंग, तर मराठा मंडळ आणि नरडवे रोडलगत इतर वाहनांसाठी पाकिंग व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होईल असा इशारा पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आज दिला. तर शहरात फळ, फुले, भाजी आणि इतर विक्रेत्यांसाठी लवकरच जागांची निश्चिती करू. त्या जागां व्यतिरिक्त दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक तसेच माल जप्तीची कारवाई होईल असा इशारा मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिला.
कणकवली शहरातील गणशोत्सव नियोजनाची बैठक नगरपंचायतीच्या सभागृहात मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलीस निरीक्षक अमित यादव आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक तथा जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, मेघा गांगण, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, विक्रेत्यांचे प्रतिनिधी अनिल हळदीवे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत कणकवली शहर बाजारपेठ आणि राष्ट्रीय महामार्ग सेवा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्यात आले. यात स्टेट बँकेसमोरील उड्डाणपुलाच्या खाली दुचाकी विक्रेत्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा निश्चित करण्यात आली. तर तहसील कार्यालयात होणाऱ्या पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती महामार्ग विभागाचे उपअभियंता एम.आर. साळुंखे यांनी दिली.
दरम्यान शहरातील मराठा मंडळ रोड आणि नरडवे रोड या रस्त्यालगत आराम बस पार्किंगसाठी जागा सर्वानुमते निश्चित करण्यात आली. तर इतर चार चाकी वाहनांच्या पार्किंग बाबत तहसील कार्यालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. कणकवली शहरात उड्डाणपुल व इतर ठिकाणी अनेक महिने बेवारसपणे वाहने उभी करण्यात आली आहेत. पुढील दोन दिवसांत ही वाहने हटविण्यात आली नाहीत तर ती वाहने पोलीस प्रशासनाच्यावतीने जप्त करण्यात येतील असा इशारा पोलीस निरीक्षक श्री.यादव यांनी दिला. तर पुढील काळात दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांच्या पार्किंगसाठी ज्या जागा निश्चित होतील तेथेच वाहन पार्किंग होणे अपेक्षित आहे. अन्यत्र वाहने उभी केल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचेही श्री.यादव यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव कालावधीत महावितरणने अखंडित वीज पुरवठा ठेवावा अशी मागणी व्यापारी प्रतिनिधींकडून करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी श्री.कंकाळ यांनी महावितरणचे अभियंता एस.एस. शिंदे यांना तशा सूचना दिल्या. कणकवली शहरातील दोन्ही फिडरवरील वीज तारांवर येणाऱ्या फांद्या आणि इतर अडथळे गणेशोत्सवापूर्वी दूर करा. तसेच आवश्यक त्या ठिकाणी विद्युत रोहित्रे,गंजलेले पोल बदलणे आदींची कार्यवाही पुढील आठ दहा दिवसांत पूर्ण करा असेही निर्देश श्री.कंकाळ यांनी महावितरणच्या अभियंत्यांना दिले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने पुढील एक दोन दिवसांत उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटाव कारवाई होणार आहे. गणेशोत्सव कालावधीपर्यंत ही कारवाई थांबवावी अशी मागणी विक्रेत्यांच्यावतीने करण्यात आली. तर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता एम.आर. साळुंखे यांनी महामार्गाच्या हद्दीत तसेच उड्डाणपुलाखालील जागेत कुठलाही व्यवसाय करण्यास अनुमती नाही. त्यासाठी महामार्ग विभाग परवानगी देणार नाही. तसेच अतिक्रमण हटाव कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी आक्रमक झालेल्या विक्रेत्यांनी, अतिक्रमण हटवायाचे झाल्यास केवळ उड्डाणपुलाखाली नको तर गडनदी आणि जानवली नदी या दरम्यान महामार्ग हद्दीत जी बांधकामे झाली आहेत ती देखील हटवा अशी मागणी केली.
कणकवली शहरात गडनदी आणि जानवली नदीवरील सहा ठिकाणच्या गणपती साण्यांवर मूर्ती विसर्जन सोहळा होणार आहे. त्यासाठी हे साणे सज्ज ठेवा. त्या परिसरात वाढलेली झाडी तोडून परिसर मोकळा करा असे निर्देश मुख्याधिकारी श्री.कंकाळ यांनी दिले.
दिगंबर वालावलकर कणकवली





