‘त्या’ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची ‘वंचित’ ची मागणी

अन्यथा कुडाळ पोलिसाना बुधवारी जाब विचारणार !
जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांचा इशारा
प्रतिनिधी । कुडाळ : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निषेधार्थ कुडाळ येथे सिंधुदुर्ग शिवप्रेमी संघटनेने केलेल्या आंदोलनाला पोलिसांनी रोखणे गरजेचे होते, मात्र हे आंदोलन करायला दिले त्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वृणाल मुल्ला यांच्याजवळ केली आहे. हे गुन्हे दाखल झाले नाही तर बुधवारी कुडाळ पोलीस ठाणे येथे जाब विचारण्यासाठी येऊ असेही त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाचा उदो उदो केला या निषेधार्थ कुडाळ येथे सिंधुदुर्ग शिवप्रेमी यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्यासह कार्यालयीन सचिव संदीप जाधव, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष रोहन कदम, तालुका अध्यक्ष वाय.जी.कदम (वेंगुर्ला), प्रभाकर साळसकर (देवगड), संजय जाधव (कणकवली), अक्षय कदम (मालवण), अंकुश जाधव (कुडाळ), बांदा विभाग अध्यक्ष संतोष जाधव, तालुका महासचिव स्वप्नील कदम (कणकवली), सखाराम जाधव, अमोल पावसकर, पंढरी पावसकर, बाबा सोनावडेकर, व्ही.डी.जाधव, सत्यवान तेंडुलकर, सागर जाधव, सरपंच समीर शिरगावकर, ग्रामपंचत सदस्य दीपक कदम, सखाराम जाधव, बिट्टू जाधव, गजानन जाधव, रामा गोवेरकर, संजय तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी सांगितले की मुळात बाळासाहेब आंबेडकर यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. काही नतदृष्ट लोकांमुळे अशा प्रकारे वातावरण निर्माण केले जात आहे. कुडाळमध्ये जे आंदोलन झाले त्याचाच एक भाग असून या आंदोलकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. हे गुन्हे तात्काळ दाखल झाले नाहीत तर बुधवार ९ ऑगस्ट रोजी कुडाळ पोलीस ठाणे येथे जाब विचारण्यासाठी येणार असल्याचे पोलीस निरीक्षक वृणाल मुल्ला यांना सांगितले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.