संत राऊळ महाराज महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीर संपन्न
१५० हुन अधिक मतदार नोंदणी
प्रतिनिधी । कुडाळ :जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कुडाळ व संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत राऊळ महाराज महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या विविध शाखेतील १५० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मतदार म्हणून आपली नोंदणी पूर्ण केली. मतदार नोंदणीसाठी विद्यार्थांना यावेळी “वोटर हेल्पलाईन ॲप” चा वापर करण्याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी निवडणूक व मतदान हा लोकशाही राज्यकारभाराचा एक अभूतपूर्व उत्सव असल्याचे प्रतिपादन केले तसेच लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी युवा तरुणांनी मतदार हक्क बजावला पाहिजे असे सांगितले. उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी देखील या शिबिरात विद्यार्थांना मतदार नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच वोटर हेल्पलाईन हे ॲप वापरून विद्यार्थांनी आपल्या घरच्या सदस्यांची देखील नोंदणी करावी असे आवाहन केले.
याप्रसंगी महसूल सहाय्यक गौरव आरोसकर यांनी या ॲपच्या प्रत्यक्ष वापराबद्दल विद्यार्थांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील एकूण २५० विद्यार्थी हे सहभागी झाले. शिबिराचे उद्घाटन हे लोकशाहीरुपी रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.बी.झोडगे हे होते. सूत्रसंचालन एन.सी.सी विभाग प्रमुख कॅप्टन एस. टी.आवटे यांनी तर आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.उमेश कामत यांनी केले.
सदर कार्यक्रमास कुडाळ प्रांत अधिकारी श्रीम.ऐश्वर्या काळूशे, कराची महाराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे सरकार्यवाह आनंद वैद्य, निवडणूक नायब तहसीलदार श्रीम.लता वाडकर, तसेच श्रीम.नीलम पारकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.भावेश चव्हाण, प्रा.सबा शहा, छात्र सेना सी. टी ओ. डॉ.योगेश कोळी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी हे उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.