कणकवली येथे संस्कृत संभाषण वर्ग संपन्न

कणकवली /मयुर ठाकूर
कणकवली येथे उत्कर्षा उपाहारगृहच्या वरच्या मजल्यावर दहा दिवसाच्या संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन संस्कृतभारती सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये सन्मा. श्री मनोहर काजरेकर (निवृत्त अध्यापक) यांनी प्रमुख अध्यापक म्हणून तर सन्मा. श्री. मकरंद आपटे (संस्कृताध्यापक, कनेडी हायस्कूल) यांनी सहाय्यक अध्यापक म्हणून काम पाहिले. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार हा संस्कृतभारती या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. सदर संस्कृत संभाषण प्रशिक्षणामध्ये एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सदर प्रशिक्षण दि. ४ जुलै ते १३ जुलै २०२३ पर्यंत सलग दहा दिवस सायंकाळी ५ ते ७ या वेळेत घेण्यात आले. अतिशय सोप्या पद्धतीने संस्कृत संभाषण कसे करावे हे वर्गामध्ये शिकवले गेले.
शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी संस्कृत गीते, स्तोत्रे, संस्कृतसंभाषणे, संस्कृत गीतांवर कथ्थक नृत्ये, संस्कृत भाषेमधून मनोगते इ. चे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व उपस्थितांनी भारतमातेचे पूजन केले व समाजनिधी म्हणून स्वेच्छेने काही रक्कम संस्कृत कार्यासाठी अर्पण केली.
सदर समारोप कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रतिथयश डॉ. बी. पी. करंबेळकर तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त संस्कृत शिक्षक श्री. अरूण वळंजू लाभले होते. संस्कृतभारती संघटनेच्या वतीने श्री. मनोहर काजरेकर यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला श्री. व सौ. सुधाकर देवस्थळी तसेच श्री. व सौ. दत्तात्रय मुंडले यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मैत्रेयी आपटे हिने केले. श्री. मकरंद आपटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.