एस.टी. आणि दुचाकी धडकेत दोघे ठार

रेल्वेस्टेशन रोड लगतची घटना
कणकवली रेल्वे स्टेशन मार्गावरील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे दुचाकी आणि एस.टी. बस यांच्यात आज धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे ठार झाले आहेत. सुनील ठाकूर (वय ४५) आणि सागर घाडीगावकर (वय २७ दोन्ही रा.हरकुळ बुद्रूक ) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.
हरकुळ बुद्रूक येथील सुनील ठाकूर आणि सागर घाडीगावकर दुपारी कणकवलीत आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास या दोघांमध्ये उपजिल्हा रूग्णालय येथे भांडण झाले. तेथील रिक्षा चालकांनी भांडण मिटवून त्यांना आपल्या घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवरून ते भरधाव वेगाने हरकूळच्या दिशेने निघाले. कणकवली रेल्वे स्थानकाचा पूल ओलांडून पुढे जात असताना कनेडी ते कणकवली अशी येणाऱ्या एस.टी. बसला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दोघेही बसला अापटून रस्त्याकडेला दुचाकीसह फेकले गेले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्यांना स्थानिकांनी तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र ते मयत झाल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
कणकवली प्रतिनिधी