अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकेडी नदीपात्रातील गाळ उपसाच्या कामाला सुरुवात

ग्रामस्थांमधून अनेक वर्ष होत होती मागणी
तीन वाड्यांचा नळयोजनेचा पाणी प्रश्न कमी होणार
गेली अनेक वर्ष प्रतीक्षा असलेल्या कणकवली तालुक्यातील साकेडी वरचीवाडी नळ योजनेच्या विहिरीलगत नदीपात्रातील गाळ उपसा करण्याच्या कामाचा आजपासून प्रारंभ करण्यात आला. या कामाकरिता सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्यानंतर आज सकाळपासून साकेडी राठकोंड या ठिकाणच्या नदीपात्रातील गाळ उपसा सुरू करण्यात आला. या नदीपात्रातून तीन वाड्याकरिता नळ योजनेच्या विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र नदीपात्रात विहिरी लगत गाळ साचल्याने स्ट्रेंज गॅलरीद्वारे पाणी येत नसल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट होत होती. यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून हाल होत होते. दरम्यान आज या कामाच्या ठिकाणी सोसायटी संचालक राजू सदवडेकर, माजी उपसरपंच व ग्रा प सदस्य जेऊर शेख, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी या ठिकाणचा गाळ उपसा करून घेण्याकरिता पाठपुरावा केला. तसेच या ठिकाणी पाणी साठा करण्याच्या दृष्टीने नदीपात्रात डोह तयार करण्यात आला असून, यामुळे पुढच्या वर्षीपासून या तीन वाड्यांच्या नळ योजनेला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे. नदीपात्रात पाण्याची पातळी वाढून राहिल्याने नळ योजनेला याचा फायदा होणार आहे. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याने गाळ उपसा सुरू करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी दिली. राठकोंड या नदीपत्रालगतवर साकेडी वरचीवाडी नळ योजनेची विहीर असून, या विहिरीलगत मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या नळ योजनेतील नळ धारकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. तसेच गतवर्षी याकरिता माजी सरपंच रीना राणे यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केला होता.पाण्याअभावी गेले काही दिवस ही नळ योजना बंद स्थितीत आहे. याकरिता गाळ उपसा करण्याची मागणी केली जात होती. ती मागणी अखेर पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ सहदेव लाड, विजय गुरव, रवींद्र कोरगावकर, गोट्या शिरसाट, गणेश मुणगेकर, यांच्यासह अन्य उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली