हापूस आंबा नुकसान भरपाई चा अहवाल जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून सादर

लवकरच आमदार नितेश राणे घेणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सन २०२२ च्या हंगामा पेक्षा सन २०२३ च्या हंगामामध्ये हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आहे. डिसेंबर २०२२ मधील वातावरणातील बदलांमुळे आंबा मोहोराचे अत्यल्प प्रमाण तसेच फुल किडीचा मोठ्या प्रमाणातील प्रादुर्भाव हापूस आंब्याचे उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरले आहे. आमदार नितेश राणे यानी मार्च २०२३ च्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायत दारांचा हा ज्वलंत प्रश्न सभागृहात मांडला होता व शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. तसेच दिनांक २५ एप्रिल २०२३ रोगी जिल्हा कृषि अधिक्षक, सिंधुदुर्ग याना नुकसानीची पाहणी करून शासनास अहवाल सादर करण्यास सूचित केले होते.
त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सिंधुदुर्ग यानी आंबा नुकसान भरपाईचा अहवाल तयार करून शासनास सादर केला आहे. या अहवालामध्ये सन २०२३ मध्ये हापूस आंबा उत्पादनामध्ये ५३% एवढी घट झाल्याचे आढळून आल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे भेट घेणार असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहेत.
कणकवली / प्रतिनिधी