ठेकेदारांकडे दिवाळी, आमच्या घरी अंधार का?

तिलारीत प्रकल्प कार्यालयासमोर रहिवाशांचा ठिय्या
११ ठेकेदारांकडे १५ लाखांची थकबाकी
कोकण नाऊ विशेष!
प्रतिनिधी l दोडामार्ग
घरभाडे आणि वीजबिलाची लाखो रूपये थकबाकी असलेल्या ठेकेदारांच्या शासकीय निवासस्थानात २४ तास वीज ठेवली जाते आणि सर्वसामान्य रहिवाशांची वीज मात्र तोडली जाते हा दुजाभाव का ? असे म्हणत बुधवारी (ता.७) तिलारी प्रकल्पाच्या कोनाळकट्टा येथील मुख्य वसाहतीतील रहिवाशांनी तिलारी शीर्षकामे उपविभाग क्रमांक २ चे उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे तिलारीतील ११ ठेकेदारांकडे घरभाडे आणि वीजबिलापोटी तब्बल १५ लाख २० हजार रूपये थकीत असल्याचे उघड झाले. त्यात ६ लाख ५१ हजार ८०६ रूपये एवढी थकबाकी फक्त वीजबिलाची आहे. ” थकबाकीदार ठेकेदारांच्या घरी दिवाळी आणि सर्वसामान्य रहिवाशांवर अंधारात राहण्याची पाळी ” अशी स्थिती तिलारीत असल्याचे त्या आंदोलनामुळे उघड झाले.
तिलारी प्रकल्पाच्या लघु, मुख्य आणि तिलारीवाडी वसाहतींमध्ये प्रकल्पाचे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, ठेकेदार राहायचे. प्रकल्प पूर्ण झाल्याने बहुतेक कर्मचारी अन्यत्र गेले.तथापि, अजूनही अनेक शासकीय निवासस्थाने ठेकेदार प्रकल्पातील कर्मचारी, प्रकल्पाबाहेरील कर्मचारी वापरतात. त्यांना शासकीय दराने किमान भाडे आकारले जाते. तरीही अनेकांनी घरभाडे आणि वीजबिले भरलेली नाहीत.रहिवाशांकडून वीजबिलापोटी सात लाखांहून अधिक थकबाकी असल्याने या आठ दिवसांत महावितरणकडून दोन वेळा वीज तोडण्यात आली. ऐन उन्हाळ्यात पहिल्या वेळी त्यांना चार दिवस अंधारात राहावे लागले तर दुसऱ्यांदा वीज तोडल्यावर एक दिवस. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी बुधवारी रहिवाशांनी कोनाळकट्टा येथील उपविभागीय कार्यालय गाठत जोपर्यंत वीजप्रवाह सुरू करत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ते आंदोलन सायंकाळी सात पर्यंत सुरू होते. वीजप्रवाह सुरू करण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता वसाहतीत वीज आली.शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संतोष मोर्ये व मदन राणे, भाजपचे रत्नकांत कर्पे यांनी रहिवाशांचे नेतृत्व केले.
रहिवाशांकडे थकबाकी आहेच; पण आमच्यात आणि ठेकेदारात तुम्ही दुजाभव का करता?ठेकेदारांकडे दिवाळी आणि आमच्या घरी अंधार का?असा त्यांचा प्रश्न होता. त्या पार्श्वभूमीवर श्री. बुचडे यांच्याकडून थकबाकीदार ठेकेदारांची यादी घेतली असता ११ ठेकेदारांकडे (प्रत्यक्षात यादीत नऊजण आहेत.८ व १० क्रमांकाच्या ठेकेदाराचे नाव यादीत नाही.) वीजबिलापोटी तब्बल ६ लाख ५१ हजार ८०६ रुपये तर घरभाडे ८ लाख ६८ हजार ८४४ रुपये अशी एकूण १५ लाख १९ हजार ९६० रुपये थकीत असल्याचे दिसले.
निम्म्याहून अधिक थकबाकी एकाकडेच
विशेष म्हणजे त्या यादीतील एका ठेकेदाराकडे ४ लाख ३८ हजार ७४२ रुपये एवढी वीजबिल थकबाकी तर ३ लाख ३५ हजार ३६८ रुपये घरभाडे थकबाकी असे मिळून ७ लाख ७४ हजार ११० रुपयांची थकबाकी आहे. एकूण थकबाकीचा आकडा पाहता ती निम्म्यापेक्षा अधिक आहे. सर्वात कमी थकबाकी घरभाडयापैकी केवळ तीन हजार आठशे नऊ रुपये एवढी एका ठेकेदाराकडे आहे.
डिटेक्टिव्ह एजन्सीकडे ४७ हजार ९६६ रुपये
त्या शासकीय वसाहतीत जी. एस.डिटेक्टिव्ह सर्व्हिसेसकडे घरभाडे ३६ हजार ७१६ रुपये व वीजबिल ११ हजार २५० रुपये थकीत आहे. ती एजन्सी कोनाळकट्ट्यात कशासाठी होती आणि काय करत होती असा प्रश्न थकबाकी प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे.
वसुलीसाठी ठेकेदारांना नोटिसा द्या: थोरात
दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी उपस्थित रहिवाशांसमोरच उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांना थकबाकीदार ठेकेदारांची यादी आपल्याला पाठवा तसेच फोन संदेशाचा संदर्भ घालून ती यादी कार्यकारी अभियंत्यांना पाठवून ठेकेदारांना दहा दिवसांत थकबाकी जमा करण्याबाबत तत्काळ नोटीस द्यायला सांगा असे सांगितले. ज्या थकबाकीदार ठेकेदारांची कामे सुरू आहेत त्यांची थकबाकी त्यांच्या देयकामधून वळती करून घ्या असे आदेशही त्यांनी श्री. बुचडे यांना दिले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ,दोडामार्ग