खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून कनेडी हायस्कूलला २५ लाख

खासदार विनायक राऊत यांनी दिलेला शब्द पाळला
खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून कनेडी हायस्कूलच्या इमारतीसाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.याबाबतची लेखी पत्र त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे दिले आहे.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई च्या वर्धापन दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विनायक राऊत हे १० जुलै २०२२ रोजी कनेडी प्रशाला येथे कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाची पाहणी करून ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थेची प्रगती व्हावी या हेतूने आपल्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये देणगी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून संस्थेसाठी २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. कनेडी शिक्षण संस्थेच्या वतीने इंग्रजी माध्यमाची पहिली ते चौथी प्राथमिक शाळा चालवली जाते. तसेच सेमी इंग्रजी आणि मराठी अशी पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षण व्यवस्था आहे. अकरावी ते बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा आहेत . विज्ञान शाखेला अलीकडेच वीस टक्के अनुदानही प्राप्त झाले आहे. विज्ञान विभागासाठी बांधकाम व्यवसायिक मंगेश सावंत आणि कुटुंबीयांकडून यापूर्वीच सुसज्ज अशी इमारत बांधून देण्यात आली आहे. आता खासदार राऊत यांच्या फंडातून माध्यमिक विभागासाठी भव्य अशी इमारत उभी केली जाणार आहे शैक्षणिक संस्थांना इमारत निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही. विनामूल्य शिक्षण देणाऱ्या अशा संस्थांची मोठी गैरसोय लक्षात घेऊन खासदार विनायक राऊत यांनी संस्थेला भरीव अशी मदत केल्याबद्दल कनेडी गड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत आणि संचालक मंडळ तसेच दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.
कणकवली प्रतिनिधी