सांस्कृतिक क्षेत्रातील दैदिप्यमान व्यक्तीमत्व हरपले

मान्यवरांची श्रीकांत सांबारी यांना श्रद्धांजली
आचरा –अर्जुन बापर्डेकर
आचरेतील संस्थांना वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणार सांस्कृतिक क्षेत्रातील दैदिप्यमान व्यक्तीमत्व हरपले अशी भावना श्रीकांत सांबारी यांच्या शोकसभेला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करत त्यांनी तन मन धन अर्पूण काम केलेल्या संस्थांना नेहमी यशोशिखरावर नेऊन ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले.
काहींना तर आपल्या भावना व्यक्त करताना अश्रूही अनावर झाले होते.
रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी यांच्या झालेल्या आकस्मिक निधनाबद्दल त्यांनी कार्य केलेल्या रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, आदर्श व्यापारी संघटना,काकड आरती कार्तिकोत्सव मंडळ,साई सेवा मंडळ या संस्थांतर्फे त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी रामेश्वर भक्त निवास येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेची सुरुवात रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे आणि सांबारी कुटूंबियांतर्फे श्रीकांत सांबारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना भिसळे यांनी रामेश्वर वाचनालयास राज्य स्तरावर ओळख ही सांबारी यांच्या कर्तृत्वामुळेच मिळाल्याचे मत व्यक्त केले.पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश हडकर यांनी आचरेतील संस्थांना वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात सांबारी यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले.चिंदर ग्रामोन्नती मंडळाचे आत्माराम नाटेकर यांनी पतसंस्थेसारखी संस्था उभी करताना श्रीकांत सांबारी यांना केवढे कष्ट करावे लागले असतील याची कल्पनाही करता येणार नाही.यासाठी या संस्थांना कायम यशोशिखरावर ठेवण्यासाठी या संस्थेपासून कायम राजकारण दूर ठेवण्याचे आवाहन केले. रवींद्र गुरव यांनी आचरे गावातील आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर यांनी सांबारी यांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर सामाजिक कार्य करणारी एखादी संस्था निर्माण करुन त्यातून लोकोपयोगी कार्य करून केली जावू शकते असे मत व्यक्त केले.भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी चारित्र्यवान व्यक्तीमत्व हरपल्याची खंत व्यक्त केली. तर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांबारी यांच्या कार्यशैलीचे वर्णन करत पतसंस्थेच्या उत्कर्षासाठी त्यांनी किती कष्ट घेतले याचे वर्णन केले. यावेळी व्यापारी संघटनेतर्फे अर्जुन बापर्डेकर,काकड आरती मंडळातर्फे बाबल्या भिसळे,साईसेवा मंडळातर्फे सौ विनीता कांबळी, जेष्ठ नागरिक संघातर्फे लक्ष्मण आचरेकर,बालगोपाळ मंडळ आणि संतसेना नाभिक पतसंस्थेच्या वतीने आनंद आचरेकर, गाडगीळ वाचनालयातर्फे सुरेंद्र सकपाळ, उपशिक्षणाधिकारी आंगणे, सानेगुरुजी कथामालेतर्फे पांडुरंग कोचरेकर,कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने रामचंद्र कुबल,विनायक परब, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सांबारी यांना श्रद्धांजली अर्पण केली.या शोकसभेला सांबारी यांचे सुपुत्र मंदार सांबारी, रघुनाथ सांबारी, पुतण्या मांगिरीष सांबारी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, व्यापारी संघटनेचे जयप्रकाश परुळेकर,काकड आरती मंडळाचे नंदकिशोर सावंत, जगन्नाथ साने,वाचनालय, पतसंस्थेचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांसह बहुसंख्य श्रीकांत सांबारी प्रेमी उपस्थित होते.