कणकवलीत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्यांकडून तब्बल 31 हजारांचा दंड

कोकण नाऊ च्या वृत्तानंतर पोलिसांकडून धडक कारवाई
वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांकडून सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा
कणकवली शहरातील वाहतूक कोंडी संदर्भात दोन दिवसांपूर्वी कोकण नाऊ च्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची कणकवलीचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्यासह पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत पटवर्धन चौकात पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील वाढ केली. त्यासोबत कणकवली पटवर्धन चौकात सातत्याने कार्यरत असणारे वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी गेल्या तीन दिवसात वाहतुकीस अडथळा करणे, मोबाईलवर संभाषण करत वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, लायसन न बाळगणे, यासह अन्य कारणाखाली तब्बल 41 वाहन चालकांवर 31 हजारांची दंडात्मक कारवाई केली. कणकवली पटवर्धन चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली असतानाच याबाबत कोकण नाऊ चॅनल च्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर याची तात्काळ दखल घेत पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. यात 8 मे रोजी 6 वाहन चालकांकडून 3 हजार 500 रुपये, 9 मे रोजी 27 वाहन चालकांवर कारवाई करत 19 हजार 500 रुपयांचा दंड तर 10 मे रोजी 8 वाहन चालकांवर 8 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसात काही प्रमाणात कणकवली शहरातील सर्विस रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या कमी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. व पोलिसांच्या सातत्याच्या कारवाईमुळे काही वाहनेही फ्लाय ओव्हर ब्रिज खालील मोकळ्या जागेतही पार्किंग केल्याने वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली. परंतु ही कारवाई सातत्याने चालू ठेवण्याची गरज असून, सर्वसामान्य प्रवाशांना व जनतेला त्रास टाळण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई सातत्यपूर्ण ठेवण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
दिगंबर वालावलकर / कणकवली