बांधकाम कल्याणकारी संघाने घेतली उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही जी तनपुरे यांची भेट

प्रतिनिधी । कुडाळ : बांधकाम कामगारांना नोंदणी / नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काम केल्याच्या दाखल्याबाबत व शासकीय लाभाबाबत बांधकाम कल्याणकारी संघाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही जी तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
  निवेदनात संघाचे जिल्हाअध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी म्हटले आहे की, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई मार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना उपरोक्त मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच सदर नोंदणी ही जीवित ठेवण्यासाठी दर वर्षी किमान ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मंडळाकडे सादर करून नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश कामगार हे नाका कामगार प्रवर्गातील असल्यामुळे अशा बांधकाम कामगारांना ग्रामसेवक यांजकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु काही ग्रामसेवक अधिकाऱ्यांकडून कामगारांना अनावश्यक कागदपात्रांची पूर्तता करण्याची नियमावली ग्रामसेवक अधिकाऱ्याकडून देण्यात येत आहे. यात स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र व बांधकाम चालू असल्याचा परवाना इत्यादि अनावश्यक कागदपत्रांची यादी आहे. सदर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कामगारांना अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे कामगारांची नोंदणी नूतनीकरण झालेली नाही त्यामुळे कामगारांना योजने अंतर्गत मिळणारे अनेक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या मंडळाकडून ठरवून दिलेल्या दाखल्याच्या स्वरूपात असलेला ठेकेदार/ घरमालक यांचा उल्लेख असलेल्या ठेकेदार/ घरमालक यांचेकडे चौकशी करून दाखला देण्यात येऊ शकतो. तसे केल्याने कामगारांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही. तरी सदर बाबतीत लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. तसेच  बांधकाम कामगार नोंदणीत अडचणी निर्माण होण्यासाठी हे  जाचक अटी गावपातळीवर ग्रामसेवक निर्माण करत आहेत हे सुद्धा निदर्शनास आणून दिले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर सचिव रविंद्र साळकर  दिपक गावडे अनिल कदम सौ. निता गावकर आदी उपस्थित होते

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!