निराधारांचे हक्काचे घर असलेल्या संविता आश्रमाला प्रशासनाचे कायम सहकार्य – जिल्हाधिकारी

पणदूर येथील संविता आश्रमाचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात

अनाथ, दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मायेची सावली देणाऱ्या पणदूर येथील संविता आश्रमाचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या आश्रमाच्या सेवाकार्याचे कौतुक करताना, निराधारांना आधार देणाऱ्या या संस्थेला जिल्हा प्रशासनाचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
संस्थेचे संचालक संदीप परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत निराधारांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती आणि वृद्धांना आश्रमात एकाच कुटुंबाप्रमाणे सांभाळले जाते. मुलांच्या शिक्षणापासून ते वृद्धांच्या आरोग्यापर्यंत विविध गरजांची काळजी घेत आश्रमाने गेल्या १३ वर्षांत सेवाकार्याचा आदर्श निर्माण केला आहे.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात बेवारस किंवा निराधार अवस्थेत एखादे लहान मूल आढळल्यास प्रशासन आणि पोलिसांचा संविता आश्रमावर विश्वास असतो. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशा मुलांची जबाबदारी आश्रमाकडून प्रेमाने स्वीकारली जाते. निराधारांना निवारा देऊन त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळणे हे मोठे आव्हान असले, तरी संदीप परब आणि त्यांची टीम हे कार्य अत्यंत समर्पित भावनेने करत आहे. या सेवाभावी कार्याला जिल्हा प्रशासनाकडून भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार सचिन पाटील, पत्रकार शेखर सामंत, संस्थेचे विश्वस्त, स्थानिक नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि आश्रमातील सदस्य उपस्थित होते.
संविता आश्रमाच्या १३ वर्षांच्या अखंड सेवाकार्याबद्दल उपस्थितांनी संस्थेचे संचालक संदीप परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच आश्रमाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!