शेअर्स खरेदी करून जास्त फायद्याचे आमिष दाखवत फसवणूक प्रकरणी आरोपी विवेक पार्टे ला पुण्यातून शिताफीने अटक

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील व पथकाची दिमाखदार कारवाई

सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील यांच्या नेतृत्वा खाली अनेक “ऑपरेशन” यशस्वी

कणकवलीतील काही डॉक्टरांची या प्रकरणात दोन वर्षा पूर्वी झाली होती फसवणूक

शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगून फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या संशयित आरोपी विवेक विजय पार्टे, (वय 53 वर्ष, रा. नसरापूर, बालाजी कलेक्शन, ता.भोर, जिल्हा-पूणे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. कणकवलीतील काही डॉक्टरांची या प्रकरणात फसवणूक झाली होती. त्यानुसार कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून संशयित आरोपी पसार होता. कणकवली पोलीस ठाणे मध्ये भा.दं.वि. कलम 406, 420, 467, 468, 471, 34 सह MPID 1999 चे कलम 3, 4(1) नुसार हा गुन्हा दिनांक 27.02.2024 रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी, साक्षीदार, ठेवीदार यांची एकूण 1,48,00,000/- रुपये (एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये) ची फसवणूक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी क्र.1)विवेक विजय पार्टे व आरोपी क्र.2) वेदिका विवेक पार्टे हे गुन्हा घडल्यापासून पसार होते. दोन्ही आरोपींचा मागील दोन वर्षांत शोध घेवूनही सदरचे आरोपी मिळून येत नव्हते. तसेच त्यांचे वास्तव्याबाबतही काही माहीती मिळून येत नव्हती. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील यांचे नेतृत्वाखाली नियुक्त पथकाने दोन्ही आरोपींच्या पार्श्वभुमीबाबत माहिती घेवून तांत्रिक विश्‍लेषणाव्दारे पुणे, नसरापूर येथे जावून सापळा लावून् शिताफीने आरोपी विवेक विजय पार्टे, वय 53 वर्ष, रा. नसरापूर, बालाजी कलेक्शन, ता.भोर, जिल्हा-पूणे याला दिनांक 24.09.2026 रोजी ताब्यात घेतले. त्याला गुन्ह्याचे पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग येथे हजर केलेले आहे. त्याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 48/2024, भा.दं.वि. कलम 406, 420* अन्वये गुन्हा दाखल असून त्यामध्येही तो पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांना गुंगारा देत मागील दोन वर्ष पोलिसांच्या हातावर तुरी देत असतानाच आरोपीस अटक करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग ने चांगली कामगिरी केलेली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, मोहन दहिकर, मा. अपर पोलीस अधीक्षक, नयोमी साटम यांचे आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक, प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक/ सनिल पाटील, सहा.पोउनि राजेंद्र जामसंडेकर, पोहेकॉ ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, रुपाली खानोलकर व अविनाश ओटवणेकर यांच्या पथकाने या केलेल्या कारवाई बद्दल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाचे कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!