वंचित समाजाच्या ४२९ निवेदनांपैकी २२ कामे पूर्ण; १७.१७ कोटींची विकासकामे मार्गी

पहिल्या वंचित जनता दरबारातून 13.79कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

१०९ कामे प्रगतीपथावर पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबारात जिल्ह्यातील वंचित समाजातील नागरिकांकडून विविध मागण्यांची तब्बल ४२९ निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनांतील मागण्यांचा पाठपुरावा करून आतापर्यंत 13.79 कोटी रुपयांची कामे मंजूर करून देण्यात आली असून, मंत्रालय स्तरावरील आणखी 3.38 कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण सुमारे १७.१७ कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री नितेश राणे बोली होते.

पुढे ते म्हणाले, जनता दरबार घेऊन केवळ प्रसिद्धी मिळविणे हा उद्देश नसून, नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्याचा हिशोब जनतेसमोर मांडणे हे आपले कर्तव्य आहे, असे पालकमंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील वंचित समाजातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी ऐकून घेण्यात आल्या. यामध्ये काही मागण्या मंत्रालय स्तरावरील, तर काही जिल्हा पातळीवरील होत्या. यावेळी जिल्हाधिकारी, समाजकल्याण विभागासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदने स्वीकारण्यात आली.

प्राप्त झालेल्या ४२९ निवेदनांपैकी आतापर्यंत २२ कामे पूर्ण झाली आहेत, तर १०९ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. पहिल्या टप्प्यात 13.79 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही कामे केवळ मंजूर करून थांबणार नसून, दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करून संबंधित नागरिकांना ती सुपूर्द करण्यासाठी आपले कार्यालय पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वंचित समाजाच्या विकासाच्या दृष्टीने या जनता दरबारातून विविध मागण्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही गावांची पूर्वीची जातिवाचक किंवा आक्षेपार्ह नावे बदलण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली होती. लोकांच्या इच्छेनुसार अशी काही गावांची नावे बदलण्यात आली असून, हा देखील महत्त्वाचा निर्णय असल्याचे राणे यांनी सांगितले.

गणेशोत्सवानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा वंचित समाजाचा जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या जनता दरबारातून प्राप्त होणाऱ्या नव्या निवेदनांनुसार जिल्ह्यातील वंचित समाजाच्या विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी पुढील कामे केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यातील दोन्ही आमदार आणि खासदार नारायण राणे यांच्यासह सर्वांना सोबत घेऊन वंचित समाजाच्या उन्नतीसाठी काम केले जात असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून विकासकामे करून दाखविण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मंजूर झालेली कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित भागातील वंचित समाजातील नागरिकांच्या मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होतील आणि त्यातून त्यांना समाधान मिळेल, असा विश्वासही पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!