तोंडवळी वाघेश्वर मंदिरात तोंडवळी प्राथमिक शाळेच्या दिंडी नृत्याने रसिक मंत्रमुग्ध

श्रावण सोमवारनिमित्त आयोजन
श्रावण सोमवारनिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवली वरची शाळेच्या मुलांनी श्रीदेव वाघेश्वर मंदिरात विविध देखाव्यांसह सादर केलेल्या ‘संत महिमा दिंडी सोहळा व वारकरी नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापिका स्मिता परब, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष नंदिनी गोलतकर व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, हितचिंतक, शिक्षणप्रमुख तसेच माजी विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी संतपरंपरेतील विविध प्रेरणादायी प्रसंगांचे सुंदर सादरीकरण केले. यामध्ये ‘रेड्या मुखी वेद’, ‘चांगदेव’, ‘गर्वहरण आणि ‘भक्त पुंडलिक’ या प्रसंगांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वारकरी वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर, अभंग आणि वारकरी नृत्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची, वारकरी संप्रदायाची आणि संतांच्या विचारांची ओळख झाली. संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने सादर करून संस्कार, भक्ती, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला.
महेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका स्मिता परब, सहकारी शिक्षक सोनल कदम विभा ठाकूर स्वयंसेविका अंजली मालंडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष नंदिनी गोलतकर माजी अध्यक्ष महेश चव्हाण, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, हितचिंतक, शिक्षणप्रमुख आणि माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






