गणेशोत्सवात वीज बिलाची सक्ती करू नका

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा महावितरणला इशारा
कोकणातील सर्वात मोठा आणि भाविकांच्या जिव्हाळ्याचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना, महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी नागरिकांवर सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कुडाळ शहरातील कोणत्याही ग्राहकाला वीज बिल भरण्यासाठी सक्ती करू नये तसेच थकबाकीच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करू नये, असा इशारा कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी दाखल होतात. प्रत्येक कुटुंबाचा सणासुदीचा खर्च वाढलेला असतो. त्यातच महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत असताना, सणाच्या तोंडावर वीज बिल भरण्यासाठी तगादा लावणे किंवा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देणे योग्य नाही, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
"सणासुदीच्या काळात नागरिकांची आर्थिक कोंडी खपवून घेणार नाही"
मंदार शिरसाट म्हणाले, “गणेशोत्सव हा कोकणातील प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. या काळात घर आणि परिसर प्रकाशाने उजळून निघणे ही नागरिकांची गरज आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत महावितरणने वीज बिल वसुलीची सक्तीची मोहीम थांबवावी. सणाच्या काळात कुडाळमधील एकाही घरगुती किंवा व्यावसायिक ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल.”
दरम्यान, महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने वीज बिलासाठी सक्ती केली, वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी दिली अथवा वीजपुरवठा खंडित केला, तर नागरिकांनी तातडीने आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही शिरसाट यांनी केले आहे. “नागरिकांच्या हक्कासाठी मी स्वतः महावितरणच्या दारात उभा राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना देऊन गणेशोत्सवाच्या काळात वसुलीसाठी नागरिकांवर सक्ती करू नये आणि शहरात सलोख्याचे व आनंदाचे वातावरण कायम ठेवावे, अशी मागणी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केली आहे.






