विद्यार्थ्यांच्या ताटात एक्स्पायरी झालेले मसाले? ; स्वच्छतागृहाशेजारी धान्यसाठा !

कुडाळातील नामांकित शाळेत पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची शाळेत धडक

शहरातील एका नामांकित विद्यालयातील शालेय पोषण आहाराच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे काही मसाले मुदतबाह्य असल्याचे, तसेच विद्यार्थ्यांसाठी वापरला जाणारा तांदूळ स्वच्छतागृहाच्या शेजारी साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती मिळताच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत धडक देत प्रशासनाकडे जाब विचारला.
या शाळेत ४०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी दररोज सुमारे १४० विद्यार्थी शालेय पोषण आहाराचा लाभ घेतात. मात्र, पोषण आहारासाठी ठेवण्यात आलेल्या मसाल्यांपैकी काही मसाले मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणारा तांदूळ स्वच्छतागृहाच्या शेजारी साठवून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. या पाहणीदरम्यान शाळेतील प्रशासकीय कामकाजाबाबतही काही त्रुटी समोर आल्याचा दावा करण्यात आला. शिक्षक विद्यार्थ्यांची हजेरी घेत असताना स्वतःची हजेरी नोंदविण्याबाबतही निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्री.चंदनशिवे, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत आणि उपशिक्षणाधिकारी श्री. किंजवडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित साहित्याचे नमुने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या वेळी शिंदे सेनेच्या कमलताई परुळेकर, अभिषेक गावडे, आबा धडाम, माजी नगरसेविका अश्विनीताई गावडे, प्रथमेश केळबाईकर, राजवीर पाटील, प्रथमेश कांबळी, चंदन कांबळी, संदेश सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुडाळसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नामांकित शाळेत पोषण आहाराच्या व्यवस्थेबाबत अशा प्रकारच्या त्रुटी आढळत असतील, तर जिल्ह्यातील इतर शाळांमधील पोषण आहाराच्या व्यवस्थेचीही तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांमधील पोषण आहाराची तपासणी करण्याची मागणी

 शासनाकडून शालेय पोषण आहारासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असताना विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता, साठवणूक आणि स्वच्छतेबाबत काटेकोरपणे तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांमधील पोषण आहाराची तपासणी करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
error: Content is protected !!