सिंधुपुत्र प्रतिष्ठान व रामवाडी विकास मंडळाचे कार्य सामाजिक बांधिलकी जपणारे सौ.अश्विनी गर्जे

कोळोशी -हडपिड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वितरण
सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी व रामवाडी विकास मंडळ हडपिडचे उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत.विद्यार्थांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळातही नाव कमवत गाव,शाळा व आईवडीलांचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन कोळोशी -हडपिड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अश्विनी गर्जे यांनी दिले.त्या सिंधुपुत्र प्रतिष्ठान व रामवाडी विकास मंडळ यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वितरण कर्यक्रमात बोलत होत्या.
शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी-हडपिड मुंबई संचलित माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिड हायस्कूलच्या एकूण १२५ विद्यार्थ्यांना सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी व रामवाडी विकास मंडळ हडपिड यांच्या सौजन्याने क्रिडा गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर संस्थेचे कार्यवाह सुरेश राणे, चेअरमन संतोष चव्हाण, माजी चेअरमन विद्याधर खोत, माजी चेअरमन किशोर राणे, रामवाडी विकास मंडळाचे रमेश राणे, सदस्य विश्वनाथ कदम, चंद्रकांत शिंदे, शंकर राणे,सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे उत्तम सावंत,दिपक चव्हाण, शैलेश इंदप, सुशील इंदप,मयुर राणे, अमित इंदप,हरेश सावंत,अजय मेस्त्री,विघ्नेश शिंदे आदी मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे म्हणाल्या की, अनेक दानशूर व्यक्ती आज आपल्याला मदत करत आहेत.मात्र आपण चांगलं शिक्षण घेऊन आईवडीलांचे कष्ट सार्थकी लावा.यावेळी सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे उत्तम सावंत म्हणाले की,मुलांना मैदानी खेळासाठी पालकांनी प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे.मुले खेळात पुढे जातीलच शिवाय आरोग्यही तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होईल.यासाठी आमचे सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे सदस्य सर्वतोपरी मदत करतील.
यावेळी माजी चेअरमन तथा विद्यमान सदस्य किशोर राणे यांनी सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व रामवाडी विकास मंडळ यांचे आभार मानत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे जेष्ठ खेळाडू व प्रशिक्षक दिपक चव्हाण यांनी हि संकल्पना मांडली आणि सर्व सिंधुपुत्र प्रतिष्ठान व मित्रपरिवाराचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यासाठी अनेक क्रिडा व शिक्षणप्रेमींनी स्वखुशीने मदत केली.






