चतुर्थी सणानिमित्त मत्स्यव्यावसायिक महिलांना मत्स्य संस्थेतर्फे कडधान्य वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेने सलग 14 व्या वर्षी गणेश चतुर्थीच्या सणाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सुमारे 2400 महिला सभासदांना ना -नफा -ना तोटा या तत्वावर कडधान्य वाटप केले आहे. आचरा विभागातील महिलांना कडधान्य वाटप करताना सिंधुदुर्ग जिल्हा महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर, संस्थेचे संस्थापक व गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, सौ. गौरी सारंग, श्रीमती. सुमाली चोपडेकर, सौ. रंजना खराडे, श्री. आदित्य केरकर व बहुसंख्य मत्स्यव्यावसायिक महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सौ. स्नेहा केरकर यांनी सांगितले की, या संस्थेची स्थापना झाल्यापासून गेली 14 वर्षे सलग आम्ही हा उपक्रम गोरगरीब मच्छीमार महिलांना गणेश चतुर्थीच्या सणामध्ये मदत करण्यासाठी सुरु ठेवला आहे. त्यास महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यावर्षी या कडधान्यामध्ये पावटे,मूग डाळ, चणाडाळ, काळे वाटाणे, हिरवे वाटाणे,चणे,चवळी,गूळ, रवा,गोडेतेल प्रति 1 किलो प्रमाणे प्रत्येक महिलेला 10 किलो कडधान्य वाटप करण्यात आले. विशेषतः किनारपट्टी भागातील कर्ली, पाट, परुळे,केळूस,देवबाग, तारकर्ली, वायरी, देवली, दांडी, धुरीवाडा, मालवण शहर, कोळंब, सर्जेकोट, तळाशील, तोंडवली, रेवंडी, आचरा इत्यादी गावातील सुमारे 2400 सभासद महिलांना वाटप करण्यात आले आहे.
आचरा येथील कडधान्य वाटप समारंभामध्ये बोलताना संस्थेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्नेहा केरकर यांनी व त्यांच्या सहकारी सभासदानी घेतलेल्या मेहनतीबाबत कौतुक केले. गेल्या 14 वर्षांमध्ये आम्ही महिला मत्स्यव्यावसायिकांच्या व्यवसायातील अडचणी दूर करणे, त्यांच्या आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, मासे विक्रीच्या ठिकाणी महिलांना सर्व सुविधा मिळाव्यात, मच्छिमार्केट व्यवस्था निर्माण करावी, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे बांधावीत, मच्छिमारांची घरे नांवे करावीत यासाठी मालवण, देवगड, वेंगुर्ला येथे मच्छिमार महिलांचे मोर्चे काढले, मत्स्य दुष्काळाच्या काळात शासनाचे रुपये 6000/- अनुदान महिला मत्स्यव्यावसायिकांना मंजूर व्हावे म्हणून धरणे आंदोलन व आक्रोश मोर्चा काढूनसुमारे 1500 महिलांना न्याय मिळवून दिला. मत्स्यखात्यकडील मत्स्य संपदा योजनेतून 75% अनुदानातून सुमारे 50 महिलांना घरोघरी मासे विक्रीसाठी ई स्कुटर मिळवून रोजगाराची संधी दिली आहे . गरजू महिलांना शासनाच्या विविध योजना प्राप्त करून देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. असेही श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
याशिवाय आता राज्य शासनाच्या मत्स्य संपदा योजनेतून मिळणाऱ्या नि:शुल्क रुपये 5000/- अपघाती विमा योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा त्यासाठी चतुर्थी सणानंतर मत्स्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन महिलांची विमा योजनेची नोंदणी करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिक महिलांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!