गणेश चतुर्थी पूर्वी सहाय्यकांमार्फत ई पीक पाहणी च्या नोंदी करून घ्या

अन्यथा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे अधिकार द्या

माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची ई-पीक पाहणी करण्यासाठी ‘पीक पाहणी सहाय्यक’ यांची नेमणूक केली आहे. परंतु एक किंवा दोन व्यक्तींकडे संपूर्ण गावातील सर्व्हे नंबरची ई-पीक पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आल्याने जलद गतीने हि प्रक्रिया होत नाही. त्याचबरोबर पीक पाहणी सहाय्यक यांनी केलेल्या ई-पीक पाहणीला मंजुरी मिळत नसल्याने सातबारावर पीक पाहणीची नोंद होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून याबाबत तात्काळ पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याचे अधिकार द्यावेत अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेले निवेदन त्यांनी म्हटले आहे, नवीन पिक कर्ज, शासकीय नुकसान भरपाई, उत्पन्न दाखले, जमीन खरेदी, विक्री प्रकरणे अशी जमिनीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण कायदेशीर,आर्थिक आणि शासकीय कामे प्रलंबित आहेत.त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईतून सिंधुदुर्गात येणाऱ्या नागरिकांना वरील कामे करता येणार नसल्याने त्यांची गैरसोय होणार असून याचा नाहक त्रास त्यांना होणार आहे.

    तरी हि गैरसोय टाळण्यासाठी गणेश चतुर्थी आधी 'पीक पाहणी सहाय्यक' यांच्यामार्फत सर्व गावातील ई-पीक पाहणी पूर्ण करून त्याची सातबारावर तात्काळ नोंद करण्यात यावी. अथवा मोबाईल एप्लिकेशन द्वारे ई-पीक पाहणी करण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावेत.
error: Content is protected !!