शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळात एसटी सेवा पूर्ववत

तिकीट ब्लॉकच्या गोंधळाने एसटी बससेवा तीन तास ठप्प

शिवसेनेसह बस संघटनांनी प्रशासनाला धरले धारेवर

एनसीएमसी पावतीधारक प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या ५ व ३ रुपयांच्या कॉम्बिनेशन तिकीट ब्लॉकच्या उपलब्धतेअभावी कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा गुरुवारी सकाळी ११.३० वाजल्यापासून विस्कळीत झाली. अचानक बसफेऱ्या थांबल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अखेर शिवसेनेने प्रशासनला जाब विचारल्यावर प्रशासनाने पर्यायी तिकिटांचा मार्ग स्वीकारल्यानंतर सुमारे तीन तासांनी बससेवा पूर्ववत करण्यात आली.
महिला सन्मान योजनेशी संबंधित एनसीएमसी पावतीधारक प्रवाशांसाठी आवश्यक असलेले कॉम्बिनेशन तिकीट ब्लॉक आगारात उपलब्ध नसल्याने तिकीट वितरणात अडचण निर्माण झाली. त्यामुळे विविध मार्गांवरील बसफेऱ्यांवर परिणाम झाला आणि अनेक प्रवासी बसस्थानकांवर ताटकळत राहिले.
अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. काही प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडला. दरम्यान, बसफेऱ्या बंद असल्याची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ आगारात धाव घेत एसटी प्रशासनाशी चर्चा केली.
शिवसेना कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे, गटनेते विलास कुडाळकर, राजवीर पाटील यांच्यासह बस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रशासनाकडे प्रवाशांची गैरसोय तातडीने दूर करून बससेवा सुरू करण्याची मागणी केली. तिकीट ब्लॉकच्या तांत्रिक अडचणीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरले जाऊ नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
अखेर शिवसेनेच्या दणक्यानंतर एसटी प्रशासनाने तातडीने हालचाली करत कुडाळ तालुक्यातील बससेवा पूर्ववत सुरू केली. बससेवा सुरू झाल्यामुळे अनेक तासांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्रवाशांच्या प्रश्नासाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आणि प्रशासनाला तत्काळ निर्णय घेण्यास भाग पाडले.
दरम्यान, आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. उपलब्ध असलेल्या अन्य तिकिटांचा पर्याय वापरून बससेवा सुरू करण्याचे लेखी निर्देश मिळाल्यानंतर बंद असलेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.

error: Content is protected !!