अणुऊर्जा प्रकल्पास आचरा गावातूनही विरोध विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मांडली भूमिका

देवगड तालुक्यात होणाऱ्या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रकल्पाच्या विरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. गाव भट्टीत घालून रोजगार निर्माण करणारा, विकास साधणारा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका घेत ग्रामसभेत आचरा येथील ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या एकमुखी विरोध दर्शवला. आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी येथील आचरा ग्रामपंचायत सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येनी सहभाग दर्शविला होता. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य, मुज्जफर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, पूर्वा तारी, सावंत, चंदू कदम, अनिल करंजे, मंगेश टेमकर, पांडुरंग वायंगणकर, सुरेश ठाकूर, एकनाथ आचरेकर, नारायण कुबल, समीर ठाकूर, अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर, शाम घाडी उपस्थित होते.
यावेळी देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावना आणि भूमिका सभेत स्पष्टपणे मांडल्या. चर्चेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पास विरोध दर्शविणारा ठराव एकमताने मंजूर केला.
बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, आम्ही आमच्या बाजूच्या परिसरात सुरू होऊ घातलेल्या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा पूर्ण आणि तीव्र विरोध आहे. हा विरोध कोणत्याही राजकीय हेतूने नसून, आमच्या पिढ्यान पिढ्यांच्या अस्तित्वाचा, आरोग्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे. अणुऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे (Radiation) कॅन्सर, जन्मजात व्यंग पांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. आमच्या येणाऱ्या पिड्यांचे आरोग्य यामुळे धोक्यात येईल. शेती आणि उपजीविकेचे नुकसान होईल. आमच्या वाडीतील बहुतांश लोकांचे जीवन शेती, फळबागा आणि पशुपालनावर अवलंबून आहे. प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्यास शेतकरी भूमीहीन होतील आणि आमच्या रोजगाराचे साधन कायमचे नष्ट होईल.

या ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनमानावर, रोजगारावर आणि नैसर्गिक संपत्तीवर परिणाम करणारे निर्णय स्थानिकांची संमती घेतल्याशिवाय घेऊ नयेत, अशीही मागणी केली. आचरा गावातील ग्रामसभेने एकमताने मंजूर केलेला हा ठराव परिसरातील नागरिकांच्या लोकशाही मार्गाने व्यक्त झालेल्या भूमिकेचे प्रतिक असल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!