पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमणप्रश्नी मनसेचा ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा

जिल्हाधिकारी पाणथळ संरक्षण समितीच्या अध्यक्ष असताना कारवाई का नाही?
कुणाल किनळेकर यांचा सवाल
तालुक्यातील पिंगुळी येथील सार्वजनिक शासकीय पाझर तलावालगत सुरू असलेल्या कथित नियमबाह्य गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पिंगुळी येथील हा पाझर तलाव राष्ट्रीय वेटलँड अॅटलसमध्ये नोंद झालेला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षित असल्याचा दावा मनसेने केला आहे. असे असतानाही तलावाच्या बफर झोन आणि पाणलोट क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असल्याचा आरोप किनळेकर यांनी केला आहे. या प्रकल्पामुळे तलावातील पाणी दूषित होण्याची तसेच भविष्यात पिंगुळी गावाच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
एकीकडे जिल्हाधिकारी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी कृत्रिम बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. मात्र, जिल्हाधिकारी या नात्याने पाणथळ संरक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असतानाही पिंगुळी येथील कायमस्वरूपी पाझर तलावाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, या तलावाची जबाबदारी असलेल्या लघु पाटबंधारे विभागाकडूनही या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तलावाचे अस्तित्व आणि गावाच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत सुरक्षित राहावा, यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या लढ्याला मनसेचा पूर्ण पाठिंबा असून, पक्षाचे पदाधिकारी उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे किनळेकर यांनी स्पष्ट केले.






