‘सिंधुदुर्गला पहिला हिंदुत्ववादी जिल्हा बनवणार’ – नितेश राणे

मेहंदळे यांच्या ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ पुस्तकाचे कुडाळात प्रकाशन

नितेश राणे यांचे हिंदुत्वावर ओजस्वी भाष्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी वाटचाल करायची असेल, तर हिंदू धर्म आणि राज्याचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठ इतिहासकार व संशोधक स्व. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेले ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पहिला हिंदुत्ववादी जिल्हा बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील मदरशांमध्ये काय सुरू आहे, याकडेही आपले लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत, शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग, स्वराज्य सक्षमीकरण प्रतिष्ठान मालवण, सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, दुर्गवीर मावळा प्रतिष्टान सिंधुदुर्ग आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग या सहा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथील मराठा समाज हॉलमध्ये स्व. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवशंभू विचारमंचचे राष्ट्रीय संयोजक व शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक सुधीर थोरात, शिवशंभू विचारमंथन कोकण प्रांताचे संयोजक भूषण साटम, कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर आणि रमाकांत नाईक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, आपण मेहेंदळे यांचे चाहते असून त्यांच्या ‘इस्लामाची ओळख’ या पुस्तकाचा संदर्भ आपल्या भाषणांमध्ये घेत असतो. आपण जे बोलतो, त्यामागे मेहेंदळे यांच्या पुस्तकांचा अभ्यास आणि ताकद आहे. औरंगजेबाच्या क्रूर राजवटीचे चित्र या पुस्तकातून स्पष्ट होते. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करून हिंदू म्हणून आपली ओळख आणि विचार जपणे आवश्यक आहे.
स्वराज्याच्या इतिहासाचे विवेचन करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मविषयक भूमिकेवर भाष्य केले. शिवाजी महाराजांची प्रतिमा धर्मनिरपेक्ष म्हणून मांडण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते की नव्हते, याबाबत मेहेंदळे यांनी पुराव्यांसह मांडणी केल्याचा दावा करत या विषयावर इतिहासाच्या आधारे चर्चा होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
शिवजयंती उत्सव, गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि धार्मिक स्थळांबाबतही त्यांनी भाष्य केले. शिवरायांचे गड-किल्ले आपल्यासाठी मंदिरांइतकेच पवित्र आहेत, असे सांगत विशाळगडावरील सद्यस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले. कुडाळ बाजारपेठेत दिसणाऱ्या नव्या चेहऱ्यांबाबतही त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
‘मी शंभर टक्के हिंदू आहे आणि हीच माझी ओळख आहे,’ असे सांगत प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपली पाहिजे, असेही राणे म्हणाले. हिंदू सणांच्या वेळी हिंदूंनीच संयम का दाखवायचा, इतरांसाठीही समान नियम असायला नकोत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी सुधीर थोरात यांनी स्व. गजानन मेहेंदळे यांच्या इतिहास संशोधन कार्याचा आढावा घेत पुस्तकाची ओळख करून दिली. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना पुढील पिढीला इस्लामची ओळख व्हावी, या उद्देशाने मेहेंदळे यांनी इस्लामचा अभ्यास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. औरंगजेबाच्या काळात हिंदूंवर लादण्यात आलेला जिझिया कर, धर्मांतराचे प्रयत्न आणि तत्कालीन धार्मिक परिस्थिती यांचा सविस्तर ऊहापोह या पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मुघलांचा पराभव करून राजकीय विजय मिळविला; मात्र त्या विजयाचे सांस्कृतिक विजयात रूपांतर करता आले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला संध्या तेरसे, सुनील पवार, डॉ. बापू भोगटे, डॉ. सुविनय दामले, अॅड. विवेक मांडकुलकर, मोहन सावंत, मंदार शिरसाट, विवेक पंडित यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक भूषण साटम यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी केले.

error: Content is protected !!