ओंकार तेली करत असलेले समाजोपयोगी काम खूप महत्वाचे – आमदार निलेश राणे

कुडाळ मध्ये वैकुंठ रथाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

ओंकार तेली हे कुडाळच्या नागरिकांसाठी साध्याच पण महत्वाच्या गोष्टीतुन करत असलेले समाजोपयोगी काम खूप महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे, असे कौतुकोद्गार आमदार निलेश राणे यांनी काढले. आपले वडील कै सुधीर राजाराम तेली यांच्या स्मरणार्थ ओंकार तेली यांनी दिलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण मंगळवारी सायंकाळी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. राणे बोलत होते.
येथील महायुती कार्यालयाच्या पटांगणात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ओंकार तेली यांनी दिलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ओंकार तेली यांच्या मातोश्री श्रीमती तेली, शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, उप जिल्हा प्रमुख अरविंद करलकर, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, संजय पडते, काका कुडाळकर, राजन तेली, नगरसेवक विलास कुडाळकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, अभि गावडे, निलेश परब, दादा पडते, संजय भोगटे, प्रसाद रेगे, निलेश तेंडुलकर, नागेश नेमळेकर, योगेश घाडी, प.स. सदस्य निखिल कांदळगावकर, रेवती राणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी ओंकार तेली यांचे कौतुक केले. ज्यांनी कोरोना काळ बघितलेला आहे त्यांच्यासाठी या वैकुंठ रथाचे महत्व खूप मोठे आहे. अशा वेळी समाजातील शेवटच्या घटकाचाही विचार करून उपक्रम राबविण्यासाठी मोठं मन लागते. ओंकार तेली हे अशाच मोठ्या मनाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे प्रत्येक सामाजिक उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. राजकारणात पदासाठी स्पर्धा करणारे अनेकजण पाहायला मिळतात; मात्र मागील निवडणुकीत ‘मला निवडणूक लढवायची नाही’ असे स्पष्टपणे सांगून पदापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देणारे ओंकार तेली यांच्यासारखे कार्यकर्ते कमी आहेत. त्यांच्या पाठीशी राणेसाहेबांचा आशीर्वाद आहेच, त्याचबरोबर आम्हीही कायम त्यांच्या सोबत राहू.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही ओंकार तेली यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले. समाजहितासाठी अशा प्रकारचे उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतील, असे त्यांनी सांगितले. आपल्या प्रास्ताविकातून ओंकार तेली यांनी या वैकुंठ रथामागची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रथाचे काम करणारे श्री. खोचरे यांचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.
कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपलब्ध करून देण्यात आलेला हा वैकुंठ रथ दुःखाच्या प्रसंगी गरजू कुटुंबांना मोठा आधार ठरणार असून, ओंकार तेली व त्यांच्या कुटुंबियांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत व कौतुक होत आहे.

error: Content is protected !!