माणूस म्हणून स्वतःला घडवा, मग बदलत्या काळाबरोबर मिळवणी करून आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्तम यश मिळवा!

ॲड. संग्राम देसाई यांचे प्रतिपादन
कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाज मंडळातर्फे फोंडाघाट येथे गुणवंत गुणगौरव सोहळा
कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ कणकवली यांच्यातर्फे ज्ञातीतील, वर्ष २०२५- २६ मधील गुणवंतांचा गौरव सोहळा पूर्णानंद भवन फोंडाघाट येथे दिमाखात पार पडला. प्रतिवर्षी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा, स्नातक व स्नातकोत्तर परीक्षा, व्यावसायिक स्पर्धा परीक्षा, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी गुणवंतांचा गौरव नामवंत मार्गदर्शकांच्या हस्ते केला जातो.
या वर्षी मुलांचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि नामांकित विधीज्ञ ॲड. संग्राम देसाई, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावचे माजी मुख्याध्यापक आणि संगीत- अभिनय – गायन – कीर्तन क्षेत्रातील जाणकार श्री. प्रशांत धोंड सर, कुडाळ येथील उद्योजक, राजकीय नेते तथा कुडाळ देशकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रणजीत देसाई, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उमेश गाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाने प्रथम उपस्थित मान्यवरांचा हृद्य सत्कार केला. मुलांचा गौरव करताना श्री धोंड सर यांनी क्षेत्र कोणतेही असो, यशप्राप्तीचा सोपान कसा चढावा हे अनेक उदाहरणे देऊन विषद केले. ॲड संग्राम देसाई आपल्या मनोगतात म्हणाले की आधी माणूस म्हणून स्वतःला घडवा, मग बदलत्या काळाबरोबर मिळवणी करून आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्तम यश मिळवा. कृत्रिम बुद्धिमत्ता हा आगामी काळातील परवलीचा शब्द असणार आहे. सबब तसे सुसंगत शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केले. श्री. रणजीत देसाई आणि उमेश गाळवणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण, व्यवसाय वा नोकरी असो, कठोर परिश्रमास पर्याय नाही हेच अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात श्री दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे मनोगत व्यक्त केले मात्र त्याचबरोबर मुलांचाही नैतिक जडण घडण करताना पालकांचा रोल काय असावा हे ही विषद केले. कणकवली तालुका समाज मंडळाच्या स्थापना काळापासून मंडळाच्या कार्याचा धावता आढावा त्यांनी घेतला. मुलांच्या सत्काराच्या वेळी प्रत्येकास वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मंदार अवसरे यांनी केले तर निवेदन- सूत्रसंचालन श्री बाबुराव सामंत यांनी केले. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत ठाकूर गुरुजी, सचिव श्री अरुण सामंत, डॉ. मधुसूदन देसाई, प्रभू गुरुजी, नंदकिशोर ठाकूर, कुडाळ येथून आलेले ज्ञातीबांधव श्री. मनोज वालावलकर, अभय सामंत, गुरु देसाई, प्रदीप नेरुरकर, प्रसाद वालावलकर, ॲड नारायण देसाई, प्रसन्ना देसाई, सुनील आजगावकर, कमलाकर महाजन, अशोक नेरुरकर, उदितानंद सामंत,डॉ. वसंत सामंत, प्रमोद सामंत, सौ गीता वहिनी सामंत, पूर्णानंद महिला मंचाच्या अध्यक्षा सौ सुलभा सामंत, अन्य पदाधिकारी, सौ. सुनेत्रा आजगांवकर, सौ सपना देसाई, प्रतिभा अवसरे, मालिनी तिरोडकर, वृद्धत्वाची तमा न बाळगता गुणवंतांना आशीर्वाद द्यायला आलेल्या आपीकाकी सामंत, शुभदा पाटील, सुयोग टिकले, प्रथमेश सामंत, रसिक नेरुरकर, हर्षद केळुसकर, पतंजली टिकले, प्रथमेश महाजन, नाना सामंत, देसाई बंधू, आदी युवक, जनरेटर सुविधेसह सुनील मंडप डेकोरेटरचे सुनील आजगावकर आणि गुणगौरव पात्र मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बहुतेकांनी सढळ हस्ते देणगी देऊन कार्यक्रमाच्या खर्चाची मिळवणी केली. शेवटी श्री बाबुराव सामंत यांनी उपस्थित पाहुणे, ज्ञाती बंधू-भगिनी आणि देणगीदार या सर्वांचे आभार मानले.






