कुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा

मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकरी तृप्ती धोंडमीसे यांच्याकडे मागणी
शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कुडाळ शहरातील सर्व शाळा आणि शासकीय आस्थापनांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (Rain Water Harvesting) बंधनकारक करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना युवासेनेचे माजी उपनगराध्यक्ष व गटनेते मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मंदार शिरसाट यांनी म्हटले आहे की, कुडाळ परिसर हा भरपूर पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र, सिमेंटीकरण आणि योग्य नियोजनाअभावी हे पावसाचे पाणी वाहून जाते. कुडाळ शहरातभविष्यात पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी अडवणे आणि ते जिरवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे –
शाळांमध्ये अंमलबजावणी – कुडाळ शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या इमारतींवर तातडीने रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यात यावी. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही जलसाक्षरता निर्माण होईल.
शासकीय इमारतींवर सक्ती – कुडाळमधील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय निवासस्थाने आणि इतर प्रशासकीय इमारतींवर ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी.
DPDC मधून निधी तरतूद – सरकारी शाळा आणि शासकीय इमारतींवर हे प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून निधीअभावी हे काम प्रलंबित राहणार नाही.
प्रशासकीय पाऊल – नवीन इमारतींच्या बांधकामास मंजुरी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट बंधनकारक करण्यात यावी. “शासकीय आस्थापना आणि शाळांनी यामध्ये पुढाकार घेतल्यास सर्वसामान्य नागरिकांनाही यापासून मोठी प्रेरणा मिळेल. प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित सकारात्मक आदेश काढावेत,” अशी विनंती मंदार शिरसाट यांनी केली आहे.
यावेळी अमरसेन सावंत, बबन बोभाटे, बाळा पावस्कर, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर उपस्थित होते.






