अल्पेश घारेच्या ‘पंढरीच्या सोहळ्या’ची अमेरिका वारी!

अल्पेश घारे पाट हायस्कुलचा विद्यार्थी
पाट हायस्कूलमध्ये कलेचे प्राथमिक शिक्षण घेतलेला अल्पेश घारे हा मुंबईत डिजीटल कॅनव्हास पेंटीग साठी प्रसिद्ध आहे. त्याच्या कल्पकतेतून तयार झालेल्या पेंटीगला परदेशातही मागणी असते. यंदाच्या खास पंढरपुरच्यावारी सोहळ्याच्या निमित्ताने हा मराठी मनाचा उत्सव साकारण्याची संधी मिळाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा डिजिटल कलाकार अल्पेश आत्माराम घारे यांनी आपल्या कल्पकतेच्या आणि कलात्मक कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. अमेरिकेतील एका ग्राहकासाठी त्यांनी तयार केलेल्या तीन भव्य डिजिटल कॅनव्हास पेंटिंग्ज आता अमेरिकेत पाठविण्यात येणार आहेत.
या कलाकृतींपैकी ८ × ८ फूट आकाराचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनावर विराजमान असलेले भव्य चित्र, ९ × ५ फूट आकारातील पंढरपूरच्या विठ्ठल वारीचे भावपूर्ण चित्रण, तसेच ६ × ६ फूट आकारातील श्री योगेश्वरी देवी, अंबाजोगाई यांचे आकर्षक चित्र विशेष लक्षवेधी ठरले आहे. महाराष्ट्राचा इतिहास, अध्यात्म, वारकरी परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे अत्यंत बारकाईने आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेले हे चित्रसंग्रह अमेरिकेतील भारतीय संस्कृतीप्रेमींना आकर्षित करणारे ठरणार आहेत.
अल्पेश घारे हे डिजिटल मॅट पेंटिंग, कॉन्सेप्ट आर्ट आणि पारंपरिक भारतीय विषयांवरील भव्य कलाकृतींसाठी ओळखले जातात. त्यांच्या कलाकृतींमध्ये भारतीय संस्कृतीचे सौंदर्य, इतिहास आणि आध्यात्मिकतेचा प्रभावी संगम अनुभवायला मिळतो.
पाट हायस्कूल च्या कला दालनातही अल्पेश घारेच्या विविध कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. आज कला विषय शिकणाऱ्या मुलांना प्रेरणादायी आहेत असे कला शिक्षक संदीप साळसकर यांनी सांगीतले. सिंधुदुर्गच्या मातीतून जागतिक स्तरावर झेप घेतलेल्या या युवा कलाकाराच्या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.






