अदानी स्मार्ट मीटर बसविण्यास आमदार निलेश राणेंचा पाठींबा!

महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांची ऑडिओ क्लिप वायरल
निलेश राणेंच्या दुटप्प्या भूमिकेवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची टीका
अदानी स्मार्ट विद्युत मीटरचे ज्यादा बिल येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबरदस्तीने हे स्मार्ट मीटर बसविले जात असल्याने जिल्ह्यातील जनता मेटाकुटीला आली आहे. स्मार्ट मीटरला सर्व स्तरातून विरोध केला जात आहे. जबरदस्तीने बसविल्या जाणाऱ्या या अदानी स्मार्ट मीटर विरोधात आमदार निलेश राणेंनी देखील पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून त्याला विरोध केला होता. जिल्ह्यातील जनतेनेही त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. परंतु आ. निलेश राणेंनी वेगळ्याच हेतूने हा विरोध केला होता हे जनतेला ठाऊक नव्हते. तो हेतु साध्य झाल्यानंतर आ. निलेश राणे यांनी परस्पर आपली भूमिका बदलून स्मार्ट मीटरचे आता ते समर्थन करत आहेत. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आमदार निलेश राणे सकारात्मक असून त्यांचा पाठींबा असल्याची माहिती महावितरणचे कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांनी दिली असून त्यांची याबाबतची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. त्यामुळे निलेश राणेंची दुटप्पी भूमिका जिल्हावासीयांसमोर उघड झाली असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे.






