सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी राजकीय दबावापोटी काम करतायत ! : खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली शंका 

कुडाळ : देवगड-जामसंडे नगरपंचायत उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली सावंत या भाजपपुरस्कृत नगरविकास समिती दाखल झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा आणि भाजपप्रणित नगरविकास समिती दाखविण्याचा निर्णय घेतला. नगरसेविका मिताली सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्धिकाऱ्यांची भेट घेऊन पत्र दिले. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी राजकीय दबावापोटी काम करतायत, अशी शंका उपस्थित केली आहे. वैभववाडी नगरपंचायतीमधील दोन नगरसेवकांचे अनधिकृत बांधकाम संदर्भातील दावे आद्यपही प्रलंबित आहेत. परंतु, देवगड नगरपंचायतीच्या एका नगरसेवकाने ६० दिवस उलटले आणि परवानगी मिळाली समजून त्याने काम सुरु केले. त्याचे ६ महिन्याच्या आत निलंबन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी राजकीय दबावापोटी काम करीत असतील तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला नक्कीच आहे, असेही खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  

काजूला गोव्याच्या धर्तीवर हमीभाव देण्याची मागणी करणार
 कोकणातील काजू पिकाला हमीभाव मिळावा, यासाठी आपण तसेच येथील लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत, असे  खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आपण स्वतः आमदार असताना सुद्धा आंबा-काजू बोर्डाची पुनर्स्थापना करावी, यासाठी प्रयत्नशील होतो. त्यातून आंबा आणि काजूला हमीभाव द्यावा अशी मागणी केली होती. तसेच गोव्याच्या धर्तीवर काजूला हमीभाव तसेच काजू बोडाला सुद्धा बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयनशील असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. 

नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक लढविल्यास आनंद 
 नारायण राणे हे लोकसभा निवडणूक लढवीत असतील तर आनंद आहे. कारण, भाजप बऱ्याच जणांचा अनेकदा बकरा करते, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत लगावलाय. यावेळी पत्रकारांनी खासदार राऊत यांना आपण निवडणूक रिंगणात असणार का ? असा प्रश्न विचारला असता त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय देतील, तो मान्य असल्याचे स्पष्ट केले.

सध्याचे शिक्षणमंत्री हे एक जोक आहे
खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. सध्याचे शिक्षणमंत्री हे एक जोक आहे. त्यांना शिक्षण खात्यापेक्षा शिक्षण खात्यामध्ये लुडबुड करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, अशी टीका केली. 
   आपण तसेच आमदार वैभव नाईक यांनी आवर्जून मागणी केली आहे की, पूर्वीप्रमाणे कोकण रिजनची निर्मिती करावी आणि शासकीय पदांची भरती करावी. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना त्या अनुषंगाने भेटणार आहोत, असे खासदार राऊत म्हणालेत. 

चिपी विमानतळ केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा 
 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हा त्यावेळच्या एका राजकीय नेत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी खाजगीकरणातून उभा केला, अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे. हा ठेकेदार पूर्णतः अपयशी असून त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून चिपी विमानतळ स्वतःच्या ताब्यात घ्यावा, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली. 

दोडामार्गमधील हत्तींचा प्रश्न स्थानिक मंत्री गांभीर्याने घेत नाहीत  
दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा प्रादुर्भाव कायम असून या प्रश्नाबाबत राज्य तसेच केंद्र सरकारला गांभीर्य नाही. येथील मंत्री अपयशी ठरलेत. दोडामार्ग भागात होणारा हत्तीचा शिरकाव याकडे येथील मंत्री लक्ष देत नाहीत. केवळ इतरांवर टीका करण्यात येथील मंत्र्यांना वेळ असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली. 

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!